पन्नास रुपये देतो सांगून तेरा वर्षांच्या मुलीवर लैगिंक अत्याचार
पिडीत मुलगी गरोदर राहिल्यांनतर प्रकार उघडकीस आला
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२९ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – पन्नास रुपये देतो असे सांगून एका तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीला जंगलात आणून तिच्यावर अज्ञात व्यक्तीने लैगिंक अत्याचार केल्याचा प्रकार मुलुंड परिसरात उघडकीस आला आहे. पोटात दुखू लागल्याने तिची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर ती गरोदर असल्याचा अहवाल डॉक्टरांकडून प्राप्त झाला. या अहवालानंतर हा प्रकार उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध मुलुंड पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
४१ वर्षांची तक्रारदार महिला तिच्या कुटुंबियांसोबत मुलुंड परिसरात राहत असून एका खाजगी कॅटरिंग कंपनीत ती कामाला आहे. तिला तेरा वर्षांची मुलगी असून ती सध्या शिक्षण घेते. ७ मेला दुपारी साडेतीन वाजता ही मुलगी मुलुंड येथील ईस्ट-वेस्ट पादचारी ब्रिजवरुन जात होती. यावेळी तिची एका अज्ञात व्यक्तीशी ओळख झाली होती. या व्यक्तीने तिला पन्नास रुपये देतो असे सांगून तिला त्याच्यासोबत येण्यास सांगितले. त्यामुळे ती त्याच्यासोबत निघून गेली होती. काही अंतरानंतर त्याने तिला तेथीलच एका जंगलात आणले होते. याच जंगलात आणल्यानंतर तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. त्यानंतर तिला घरी जाण्यास सांगितले होते. जाताना तिने हा प्रकार कोणालाही सांगू नकोस असे सांगितले होते. त्यामुळे तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता.
काही दिवसांपासून तिच्या पोटात वेदना होऊ लागले होते. त्यामुळे तिच्या आईने तिला सायन हॉस्पिटलमध्ये आणले होते. तिथेच तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल प्राप्त होताच ती गरोदर असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर तिच्या आईने तिला विचारणा केल्यानतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर तिने मुलुंड पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मे महिन्यांत घडली होती. त्यामुळे मे महिन्यांतील मुलुंड परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरु केला आहे.