चारित्र्याच्या संशयावरुन होणार्या छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या
आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
11 नोव्हेंबर 2025
मुंबई, – चारित्र्याच्या संशयावरुन होणार्या मानसिक व शारिरीक शोषणाला कंटाळून सोनाली विजय धवन या 40 वर्षांच्या महिलेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मुलुंड परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी विजय सदाशिव धवन (48) या आरोपी पतीविरुद्ध मुलुंड पोलिसांनी पत्नीचा छळ करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून चौकशीनंतर आरोपी पतीवर अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
ही घटना शनिवारी 8 नोव्हेंबरला सायंकाळी साडेपाच ते पावणेसहाच्या सुमारास मुलुंड येथील आशानगर, सनशाईन टॉवर इमारतीच्या 21 व्या मजल्यावरील 2106 फ्लॅटमध्ये घडली. स्वप्नील राजू कोलार हा डोबिवली परिसरात राहत असून डिलीव्हरी बॉयचे काम करतो. त्याला तीन बहिणी असून त्यापैकी सोनाली नावाच्या बहिणीचे अकरा वर्षांपूर्वी विजय धवन याच्यासोबत विवाह झाला होता. विवाहानंतर ती मुलुंड येथील आशानगर, सनशाईन टॉवर इमारतीमध्ये राहण्यासाठी आली होती. विवाहानंतर त्यांना दहा आणि आठ वर्षांच्या मुली झाल्या होत्या. विजय हा मुलुंड येथील एका संस्थेत स्वयसेवक म्हणून कामाला होता.
याच संस्थेत सोनाली ही गेल्या दहा वर्षांपासून स्वयंसेवकासाठी जेवण बनविणे, साफसफाईचे काम करत होती. गेल्या काही वर्षांपासून विजय हा सोनालीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा सतत मानसिक व शारीरिक शोषण करत होता. तिचा मोबाईल चेक करणे, तिला कॉल घेण्यास मनाई करत होता. कामावरुन उशीर झाला की तिला सतत जाब विचारुन टोमणे मारत होता. याबाबत सोनालीने तिच्या कुटुंबियांना ही माहिती सांगितली होती. मात्र ते सर्वजण तिची समजूत घालत होते. 23 ऑक्टोंबरला भाऊबीज असल्याने स्वप्नील हा त्याची आई, बहिणीसह भावासोबत सोनालीच्या घरी आले होते. यावेळी त्यांना तिचा रुम बंद असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी विजयला कॉल केला होता, यावेळी त्याने त्यांना जवळच असलेल्या ठिकाणी भेटायला बोलाविले होते.
तिथे विजय हा सोनालीसोबत होता. यावेळी त्यांना सोनालीच्या शरीरावर मारहाण अनेक जखमा दिसत होत्या. त्याच्या दोन्ही डोळ्यांखाली जखम होती. याबाबत त्यांनी विजयला सोनालीला मारहाण केल्याचा जाब विचारला होता. मात्र तो काहीही उत्तर न देता तेथून निघून गेला होता. विजयकडून होणार्या मानसिक व शारीरिक शोषणाला सोनाली ही प्रचंड कंटाळून गेली होती. तो तिच्या चारित्र्यावर सतत संशय घेऊन तिला त्रास देऊन बेदम मारहाण करत होता. त्यातून तिला प्रचंड नैराश्य आले होते. 8 नोव्हेंबरला सायंकाळी पावणेसहा वाजता विजयने त्याची बहिण वैशालीला कॉल करुन सोनालीने आत्महत्या केल्याची माहिती सांगितली.
तिच्याकडे एक सुसायट नोट सापडली असून त्यात तिने तिचा अफेसर असल्याचे नमूद केल्याचे सांगितले. ही माहिती मिळताच संपूर्ण कोलार कुटुंबियांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे ते सर्वजण मुलुंड येथील अग्रवाल हॉस्पिटलमध्ये गेले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी सोनालीला मृत घोषित केल्याचे सांगितले. चौकशीदरम्यान सोनालीने पतीकडून होणार्या छळाला कंटाळून घरातील फॅनला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे समजले. यावेळी पोलिसांनी तिच्याकडील सुसायट नोट त्यांना दाखविली होती. मात्र ते हस्ताक्षर सोनालीचे नव्हते. ती सुसायट नोट विजयने लिहून तिने सुसायट केल्याचा बनाव केल्याचा आरोप केला.
या घटनेनंतर पोलिसांनी स्वप्नील कोलार याची जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीत त्याने विजयनेच त्याच्या बहिणीचा चारित्र्याच्या संशयावरुन मानसिक व शारीरिक शोषण करुन तिला आत्महत्या केल्याचा आरोप करुन त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर विजय धवन याच्याविरुद्ध पोलिसांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याने विजयवर अद्याप अटकेची कारवाई नसल्याचे पोलिसांनी सांगितले.