माझगाव कोर्टाच्या न्यायाधिशांसह लिपीकाविरुद्ध गुन्हा दाखल
केसचा निकाल बाजूने पारित करण्यासाठी 25 लाखांची लाचेची मागणी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 नोव्हेंबर 2025
मुंबई, – माझगाव दिवाणी विशेष सेशन कोटा्रने अतिरिक्त सत्र न्यायाधिश एजाजुद्दीन सलाउद्दीन काझी आणि लिपीक व टंकलेखन चंद्रकांत हनमंत वासुदेव यांच्याविरुद्ध मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. केसचा निकाल बाजूने पारित करण्यासाठी चंद्रकांत वासुदेव याला 25 लाखांच्या लाचेची मागणी करुन तडतोडीनंतर पंधरा लाख रुपयांची लाच घेताना या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले. इतकेच नव्हे तर लाचेची रक्कम स्विकारल्यानंतर चंद्रकांतने अतिरिक्त सत्र न्यायाधिश एजाजुद्दीन काझी यांना कॉल करुन लाचेची रक्कम घेतल्याची माहिती दिली होती. त्यामुळे त्यांनाही या गुन्ह्यांत सहआरोपी करण्यात आले आले आहे. त्यांच्यावर अद्याप अटकेची कारवाई करण्यात आली नसून त्यांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. लाचेच्या गुन्ह्यांत अतिरिक्त सत्र न्यायाधिशांवरच गुन्हा दाखल झाल्याने न्यायालयीन कर्मचार्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
यातील तक्रारदाराच्या पत्नीच्या मालकीच्या जागेवर बळजळीने कब्जा करण्यात आला होता. या जागेबाबत त्यांनी 2015 मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका सादर केली होती. 27 एप्रिल 2024 रोजी उच्च न्यायालयाने या जागेच्या थर्ड पार्टी राईट्स निर्माण स्थगिती दिली होती. तसेच ज्या केसेस दहा कोटीपेक्षा कमी आहेत, त्या सर्व केसेस दिवाणी सेशन कोर्टात वर्ग केले होते. त्यामुळे तक्रारदारांची याचिका कर्मशियल शूट म्हणून मार्च 2024 रोजी माझगाव येथील विशेष सेशन कोर्टात ट्रान्स्फर झाली होती. या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधिश एजाजुद्दीन काझी यांच्या कोर्ट क्रमांक चौदामध्ये सुरु होती.
याच कोर्टात चंद्रकांत वासुदेव हे लिपीक आणि टंकलेखन म्हणून कामाला आहे. 9 सप्टेंबर 2025 रोजी तक्रारदार त्यांच्या याचिकेच्या सुनावणीसाठी कोर्टात हजर होते. यावेळी चंद्रकांत यांनी तक्रारदारांना कॉल केला होता. प्रत्यक्षात भेटून बोलायचे आहे असे सांगितले. 12 सप्टेंबर तक्रारदार चंद्रकांत यांना भेटण्यासाठी त्यांच्या स्टारबक्स कॅफे चेंबर्समध्ये गेले होते. यावेळी त्यांनी त्यांना केसचा निकाल त्यांच्या बाजूने पारित करण्यासाठी 25 लाखांची मागणी केली होती. त्यापैकी दहा लाख स्वतसाठी तर उर्वरित पंधरा लाख अतिरिक्त सत्र न्यायाधिश एजाजुद्दीन काझी यांना द्यावे लागतील असे सांगितले.
मात्र त्यांनी 25 लाख रुपये देणे शक्य नसल्याने त्यांच्या ऑफरला नकार दिला होता. यावेळी चंद्रकांतने त्यांना विचार करुन सांगा असे सांगितले होते. त्यानंतर चंद्रकांत त्यांना सतत कॉल करुन पैशांची मागणी करत होते. ही लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी 10 ऑक्टोंबर 2025 रोजी मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची संबंधित अधिकार्यांनी शहानिशा केली होती. त्यात चंद्रकांतने त्यांच्याकडे केसचा निकाल त्यांच्या बाजूने पारित करण्यासाठी 25 लाखांच्या लाचेची मागणी केली होती.
मात्र तडजोडीनंतर त्यांच्यात 15 लाख रुपये देण्याचे ठरले होते. ठरल्याप्रमाणे मंगळवारी तक्रारदार पंधरा लाखांची लाचेची रक्कम चंद्रकांत यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी त्यांच्याकडून पंधरा लाख घेतली आणि कॉलवरुन अतिरिक्त सत्र न्यायाधिश एजाजुद्दीन काझी यांना पेसे मिळाल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी त्यास संमती दर्शविली होती. या घटनेनंतर तिथे सापळा लावेलल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चंद्रकांत वासुदेवला लाचेच्या रक्कमेसह रंगेहाथ अटक केली होती. त्यांचा मोबाईल जप्त केला होता.
याप्रकरणी त्याच्यासह अतिरिक्त सत्र न्यायाधिश एजाजुद्दीन काझी यांच्याविरुद्ध लाचेची मागणी करणे, तडजोडीनंतर लाचेची पंधरा लाखाची रक्कम स्विकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकेनंतर चंद्रकांतला बुधवारी दुपारी विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याच गुन्ह्यांत एजाजुद्दीन काझी यांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्यांची संबंधित पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या जबानीनंतर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान अतिरिक्त सत्र न्यायाधिशासह दोघांवर लाचप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने मुंबईतील सर्वच न्यायालयीन अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती.
चालू वर्षांतील मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची आतापर्यंत सर्वांत मोठी कारवाई असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त प्रविण नावडकर, पोलीस निरीक्षक सुनित दिघे व अन्य पोलीस पथकाने केल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त मनिषा झेंडे यांनी सांगितले.