गर्दीचा फायदा घेऊन महिलेशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न
आरोपीस अटक; घाटकोपर-मरोळ मेट्रो लोकलमधील घटना
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२७ मार्च २०२४
मुंबई, – गर्दीचा फायदा घेऊन एका महिलेशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग झाल्याचा प्रकार घाटकोपर-मरोळ मेट्रो प्रवासादरम्यान उघडकीस आला आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन अंधेरी पोलिसांनी ५४ वर्षांच्या आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
२८ वर्षांची तक्रारदार महिला ही शहाड परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहते. अंधेरीतील एका खाजगी कंपनीत कामाला असल्याने ती दररोज शहाड येथून घाटकोपरने लोकल आणि घाटकोपर-डी. एन नगर असा मेट्रोने प्रवास करते. गुरुवारी २५ एप्रिलला सकाळी साडेदहा वाजता ती घाटकोपर येथून मेट्रोने प्रवास करताना ती तिच्या पतीसोबत मोबाईलने बोलत होती. यावेळी तिच्या मागे उभ्या असलेल्या एका प्रवाशाचा तिला सतत धक्का लागत होता. त्यामुळे तिने त्याच्याकडे रागाने पाहिले होते. त्यामुळे तो इसम मागे सरकला होता. काही वेळानंतर त्याने पुन्हा तिला मागून धक्का देण्याचा प्रयत्न करुन तिच्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिने त्याला रागाने ओरडले, त्यामुळे तो पळू लागला. मरोळ रेल्वे स्थानकात आल्यानंतर तो पळून असताना तिने त्याचा पाठलाग करुन त्याला तिथे उपस्थित सिक्युरिटी कर्मचार्यांच्या मदतीने पकडले. त्यानंतर त्याला अंधेरी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. याप्रकरणी या महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध ३५४, ३५४ अ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला शुक्रवारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्याच्या वतीने कोर्टात जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. आरोपी डोंबिवली येथे राहत असून त्याच्या अटकेची माहिती नंतर त्याच्या भावाला देण्यात आली होती असे पोलिसांकडून सांगण्यात आले.