सफाई कर्मचार्याच्या नोकरीसाठी लाच घेणे महागात पडले
महानगपालिकेच्या अंधेरीतील के-पूर्व वॉर्डच्या मुकादमाला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३ जानेवारी २०२५
मुंबई, – महानगरपालिकेत सुरुवातीला कंत्राटी तर सहा महिन्यानंतर कायमस्वरुपी सफाई कर्मचारी म्हणून नोकरी देण्याचे आश्वासन देऊन तीन लाखांची लाचेची मागणी करुन वीस हजार रुपयांची लाच घेताना सतीश पिंट्या जाधव या ५५ वर्षांच्या मुकादमाला मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली.
सतीश हा अंधेरीतील महानगरपालिकेच्या के-वेस्ट वॉर्डमध्ये मुकादम म्हणून कामाला होता. अटकेनंतर त्याला विशेष सेशन कोर्टाने गुरुवार ९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नोकरीसाठी लाचेची मागणी करुन लाच घेणे सतीश जाधवला चांगलेच महागात पडले. यातील तक्रारदार सुरक्षारक्षक म्हणून कामाला आहे. त्यांना कायमस्वरुपी नोकरीची गरज होती. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. याच दरम्यान त्यांची त्यांच्या परिचित व्यक्तीमार्फत सतीश जाधव यांच्याशी ओळख झाली होती.
या ओळखीदरम्यान त्यांना सतीश हा महानगरपालिकेत मुकादम म्हणून कामाला असल्याचे समजले होते. त्याने त्यांना मनपामध्ये सफाई कर्मचारी म्हणून नोकरी मिळवून देतो असे सांगितले. सहा महिने कंत्राटी कामगार म्हणून काम केल्यानंतर त्याला कायमस्वरुपी नोकरीचे आश्वासन देण्यात आले होते. या कामासाठी त्याने त्यांच्याकडे तीन लाखांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी पन्नास हजार रुपये कागदपत्रे तयार करण्यासाठी तर काम झाल्यानंतर उर्वरित अडीच लाख रुपये देण्याचे ठरले होते.
ही लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी सतीश जाधव याच्याविरुद्ध ३० डिसेंबर २०२४ रोजी मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सतीश जाधव यांनी लाचेची मागणी करुन २ जानेवारीला अर्जासह कागदपत्रे घेऊन येण्यास सांगितले. यावेळी त्याने त्यांना वीस हजार रुपये आणण्यास सांगिलते होते.
ठरल्याप्रमाणे गुरुवारी तक्रारदार वीस हजार रुपये घेऊन गेले होते. यावेळी लाचेची रक्कम घेताना सतीश जाधव यांना या अधिकार्यांनी रंगेहाथ अटक केली. अटकेनंतर शुक्रवारी दुपारी त्याला विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला ९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.