चौदा वर्षांच्या मुलीच्या हत्येतील आरोपी पित्याला अटक
हत्येनंतर मुंबईहून बिहारला पळून गेल्याचे तपासात उघडकीस
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – कौटुंबिक वादातून स्वतच्याच अजगरी मोहम्मद सुलेमान कुजरा या चौदा वर्षांच्या मुलीची हत्या तसेच पत्नी नसीमा मोहम्मद सुलेमान कुजरात तिच्यावर प्राणघातक हल्ला केल्यानंतर पळून गेलेल्या आरोपीस अखेर गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी बिहार येथून अटक केली. मोहम्मद सुलेमान रज्जाक कुजरा असे या 40 वर्षीय आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला पुढील कारवाईसाठी वाकोला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. मोहम्मद सुलेमानकडे काहीच कामधंदा नव्हता, त्यात त्याला दारु पिण्याचे व्यसन होते, याच कारणावरुन होणार्या भांडणातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे.
ही घटना बुधवारी 15 ऑक्टोंबर रात्री दहा ते गुरुवारी 16 ऑक्टोंबर दुपारी दोनच्या दरम्यान सांताक्रुज येथील कालिना, ओल्ड सोसायटी रोडच्या तकदीर हॉटेल, शिवनगर चाळीत घडली. याच चाळीतील पहिल्या मजल्यावरील रुम क्रमांक 124 मध्ये मोहम्मद सुलेमान हा त्याची पत्नी नसीमा आणि मुलांसोबत राहत होता. तो पेंटर म्हणून काम करत होता. बुधवारी रात्री त्याचे पत्नीसह मुलीसोबत कौटुंबिक वादातून रागाच्या भरात त्याने नसीमा आणि त्याची चौदा वर्षांची मुलगी अजगरी यांच्यावर तिक्ष्ण हत्यारासह जड वस्तूने प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात ते दोघेही गंभीररीत्या जखमी होऊन बेशुद्ध झाल्या होत्या. त्यानंतर तो घरातून पळून गेला होता.
गुरुवारी दुपारी हा प्रकार निदर्शनास येताच स्थानिक रहिवाशांनी ही माहिती वाकोला पोलिसांना दिली होती. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी बेशुद्धावस्थेत घरात पडलेल्या दोन्ही मायलेकींना पोलिसांनी तातडीने जवळच्या व्ही. एन देसाई हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे अजगरी हिला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर नसीमा हिच्यावर उपचार सुरु केले होते. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला आयसीयूमध्ये हलविण्यात आले होते. याप्रकरणी नसीमाचा भाऊ निजामुद्दीन कारी राईन याच्या तक्रारीवरुन वाकोला पोलिसांनी मोहम्मद सुलेमान कुजरा याच्याविरुद्ध हत्येसह हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. हत्येनंतर मोहम्मद सुलेमान हा पळून गेला होता.
दुसरीकडे या हत्येसह हत्येच्या प्रयत्नाच्या घटनेची पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त निशीय मिश्रा, शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर गुन्हे शाखेच्या युनिट आठ, नऊ आणि दहाच्या अधिकार्यांनी पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरु केला होता. आरोपीने त्याचा मोबाईल बंद ठेवून पलायन केले होते. त्यामुळे त्याची कुठलीही माहिती पोलिसांना मिळत नव्हती. तरीही सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहिती पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला होता.
तपासात तो बिहार येथील गावी पळून गेल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीनंतर सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत राजे यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र पाटील, मनोजकुमार प्रजापती, राहुल प्रभू, संग्राम पाटील, रोहन बगाडे, पोलीस उपनिरीक्षक सुजीत म्हैसधुने, सहाय्यक फौजदार महेंद्र यादव, पोलीस हवालदार किणी, सचिन काकडे, पाटील, बाराहाते, गुंड, सोनावणे, अतिग्रे, पोलीस शिपाई रहेरे, राहुल सकट, योगेश काकड, योगेश सटाले यांनी मोहम्मद सुलेमानला त्याच्या बिहार येथील गावातून शिताफीने ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्यानेच त्याच्या मुलीची हत्या व पत्नीवर प्राणघातक हल्ला केल्याची कबुली दिली होती. मोहम्मद सुलेमान हा पेंटर म्हणून काम करत होता, त्याला फारसे काम मिळत नव्हते. त्यातच त्याला दारु पिण्याचे व्यसन होते. त्याच्या याच व्यसनामुळे त्याचे त्याच्या पत्नीशी नेहमी खटके उडत होते. गुन्ह्यांच्या दिवशी तो नेहमीप्रमाणे मद्यप्राशन करुन घरी आला होता. यावेळी त्याचे त्याच्या पत्नीशी भांडण झाले होते. त्याचा राग आल्याने त्याने अजगरीची हत्या केली तर नसीमा हिच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचे तपासात उघडकीस आले. बिहारहून त्याला पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले असून अटकेनंतर त्याला वाकोला पोलिसांच स्वाधीन करण्यात आले आहे.