पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देऊन वयोवृद्धाची फसवणुक

70 लाखांना गंडा घालणार्‍या सहाजणांच्या टोळीला अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
17 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – पहलगाम दशहतवादी हल्ल्याचा संदर्भ देऊन एका वयोवृद्धाची सुमारे 70 लाखांची फसवणुक करणार्‍या एका सुशिक्षित बेरोजगार सायबर टोळीचा रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत सहा पदवीधरांना पोलिसांनी अटक केली असून ते सर्वजण गुजरातच्या अहमदाबादासह राजस्थानच्या जयपूर, जौधपूर, उदयपूर व म्हैसानाचे रहिवाशी आहे. सुरेशकुमार मगनलाल पटेल, मुसरान इक्बालभाई कुंभार, चिराग महेशभाई चौधरी, अंकितकुमार महेशभाई शाहा, वासुदेव ऊर्फ विवान वालजीभाई बारोट आणि युवराज ऊर्फ मार्को लक्ष्मणसिंग सिकरवार अशी या सहाजणांची नावे आहेत. या टोळीकडून पोलिसांनी साडेदहा लाखांची कॅश फ्रिज केली तर आतापर्यंत पंधराहून बँक खाती सिल करण्यात आले आहे. अटकेनंतर सहाही आरोपींना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. ही टोळी फसवणुकीसाठी सायबर ठगांना विविध बँकेत खाती उघडून देण्यास मदतीसह सिमकार्ड मिळवून देत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

तूहीनकुमार सलीलकुमार मुखर्जी हे 73 वर्षांचे तक्रारदार परळ येथे राहत असून ते एका खाजगी कंपनीतून निवृत्त झाले आहेत. सध्या ते एका खाजगी कंपनीत सल्लागार म्हणून काम पाहतात. 25 सप्टेंबरला ते त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांना एका अज्ञात महिलेचा कॉल आला होता. तिने तिचे नाव विनिता शर्मा असल्याचे सांगून ती दिल्लीतील एटीएस कंट्रोल रुममधून बोलत असल्याचे सांगितले. पहलगाम येथे झालेल्या दशहतवादी हल्ल्यासंदर्भात दिल्ली एटीएसने मुंबई शहरात काही ठिकाणी छापे टाकून कारवाई केली होती. त्यात काही लोकांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यात मोठमोठे बिल्डर्स, उद्योजक आणि प्रशासकीय अधिकार्‍यासह त्यांचा नावाचा समावेश आहे. पहलगामच्या दशहतवाद्यांना त्यांनी मदत केल्याचे काही पुरावे त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे त्यांना दिल्लीतील एटीएस कार्यालयता चौकशीसाठी यावे लागणार असल्याचे सांगितले. त्यांनी तपासात सहकार्य केले नाहीतर त्यांचे सर्व बँक खाते फ्रिज होतील अशी धमकी दिली होती.

या महिलेने या संपूर्ण प्रकरणाचा तपास एनआरएचे दिल्लीतील तपास अधिकारी आणि आय प्रेमकुमार गौतम हे करत आहेत असे सांगितले. त्यानंतर त्यांना सतत तीन ते चार अज्ञात व्यक्तींकडून कॉल येत होते, मात्र त्यांनी कोणाचेही कॉल घेतले नाही. याच दरम्यान त्यांना एक व्हिडीओ कॉल आला होता. यावेळी त्यांना समोर एक 40 वर्षांचा व्यक्तीचा आयपीएस दर्जाचा पोलीस युनिफॉर्म घातलेला व्यक्ती दिसला. त्याने स्वतचे नाव प्रेमकुमार गौतम असल्याचे सांगून त्यांची पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात चौकशी सुरु असल्याचे सांगितले. त्यांचा मनी लॉड्रिंगमध्ये सहभाग उघडकीस आला आहे. तुमचे जीवन धोक्यात असून तुमच्या प्रत्येक हालचालींवर आमची नजर असल्याचे सांगितले. तसेच नव्हे तर त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट निघाले असून त्यांना अरेस्ट वॉरंटचा मोबाईलवरुन फोटो दाखविला होता. तुमचे सर्व बँक खाते बंद करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांनी त्यांचे बायोडाटा, पॉलिटिकल आयडीओलॉजी हे सर्व लिहून त्यांचे बॉस सदानंद दाते यांना पाठवा असे सांगितले. त्यांच्यासोबत कोण कोण राहते, त्यांच्या बँक खात्याची डिटेल्स पाठवण्यास सांगितले.

या संपूर्ण घटनेने तूहीनकुमार मुखर्जी हे प्रचंड घाबरले होते. भीतीपोटी त्यांनी हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. दुसर्‍या दिवशी त्यांना अन्य एका व्यक्तीने कॉल करुन ते आयपीएस अधिकारी सदानंद दाते बोलत असलचे सांगितले. त्यांनी त्यांच्याकडून त्यांच्या बँक खात्याची माहिती काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी सदानंद दाते नावाने बोलणार्‍या व्यक्तींनी ती माहिती त्यांना डिटेल शीट बनवून पाठविण्यास सांगितले. तुमचे पैसे व्हाईट आहे का याची चौकशी होणार आहे. तोपर्यंत त्यांना बॅकेतून कुठलाही व्यवहार करता येणार नाही असे सांगतले. त्यानंतर त्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना एका बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करण्यास सांगितले. त्यामुळे त्यांनी त्याच्या सांगण्यावरुन संबंधित बँक खात्यात टप्याटप्याने सत्तर लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. चौकशी पूर्ण होताच त्यांना त्यांची सर्व रक्कम परत मिळेल असे सांगितले. ही चौकशी सुरु असताना त्याने त्यांना त्यांच्या एफडीची रक्कम काढून त्याला पाठविण्यास सांगितले.

हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी आरएके मार्ग धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना सांगितला. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित विनिता शर्मा, प्रेमकुमार गौतम आणि सदानंद दाते नाव सांगणार्‍या अज्ञात सायबर ठगाविरुद्ध भारतीय न्याय सहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या घटनेची पोलीस आयुक्त देवेन, अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, पोलीस उपायुक्त रागसुधा आर यांनी गंभीर दखल घेत पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशांनतर सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद तावडे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक संदीप ऐदाळे, गुन्हे शाखेचे तपास अधिकारी गोविंद खैरे, महेश मोहिते, सायबर सेलचे अधिकारी योगेश खरात आणि एटीएस पथकाने तपास सुरु केला होता.

ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती. त्या बँकेची माहिती काढून या पथकाने 4 ऑक्टोंबरला गुजरात आणि राजस्थानातून सुरेशकुमार पटेल, मुसरान कुंभार, चिराग चौधरी आणि अकिंतकुमार शाहा या चौघांना तर 13 ऑक्टोंबरला गुजरातच्या अहमदाबाद शहरातून वासुदेव ऊर्फ विवान आणि युवराज ऊर्फ मार्को या सहाजणांना अटक केली होती. या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस येताच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. तपासात ते सर्वजण गुजरात आणि राजस्थानचे रहिवाशी असून ऑनलाईन फसवणुक करणार्‍या काही सायबर ठगांच्या संपर्कात असल्याचे उघडकीस आले. यातील मार्को हा गेल्या दोन तर तर पाच आरोपी सहा ते एक वर्षांपासून या क्षेत्राशी संबंधित आहे. मार्को हा पहिल्याच पकडला गेला असून तोच बँकेचे सर्व व्यवहार पाहत होता. त्यांच्याकडून पोलिसांनी अकरा मोबाईल, विविध बँकेचे डेबीट, क्रेडिट कार्ड, पासबुकसह इतर मुद्देमाल जप्त केला तर त्यांच्या बँक खात्यात साडेदहा लाखांची रक्कम फ्रिज करण्यात आली आहे.

सुरेशकुमार, मुसरान, चिराग आणि अंकितकुमार हे चौघेही पदवीधर आहे. विवाहचे बीएपर्यंत तर मार्कोचे बीटेकपर्यंत शिक्षण पूर्ण झाले आहे. फसवणुकीची रक्कम त्यांनी एका बँकेकडून वेगवेगळया 241 बँक खात्यात ट्रान्स्फर केले होते. त्यांनतर ती रक्कम एटीएममधून काढून सायबर ठगांना ट्रान्स्फर केली होती. याकामी प्रत्येकाला प्रत्येक व्यवहारामागे अडीच ते तीन टक्के कमिशन मिळत होते. या सायबर ठगाने पहलगाम हल्ल्याचा संदर्भ देऊन ही फसवणुक केली होती. या टोळीने उघडलेल्या बँक खात्यात मुंबईसह देशभरात 31 गुन्ह्यांतील रक्कम ट्रान्स्फर झाली होती. या गुन्ह्यांत तपास महाराष्ट्र राज्य सायबर युनिटसह मुंबई, बंगलोर, भोपाळ, आग्रा, तामिळनाडू तेलंगणा, गुजरात, दिल्ली, हरियाणा, केरळ, कोलकाता पोलिसांकडून तपास सुरु आहे.

या टोळीने अशाच प्रकारे रायगडमध्ये एका वयोवृद्धाला पहलगाम हल्ल्याचा संदर्भ देऊन 40 लाखांना गंडा घातला होता. मात्र ही माहिती प्राप्त होताच पोलिसांनी संबंधित तक्रारदाराला सतर्क केले होते. त्यामुळे त्यांची आणखीन फसवणुक झाली नव्हती. अटकेनंतर सहापैकी चारजण न्यायालयीन तर इतर दोनजण पोलीस कोठडीत आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page