आर्थिक वादातून व्यावसायिकावर चाकूने प्राणघातक हल्ला
हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत 62 वर्षांच्या वयोवृद्धाला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 फेब्रुवारी 2025
मुंबई, – आर्थिक वादातून अय्याज इम्तियाज मिर्झा या 41 वर्षांच्या व्यावसायिकावर त्याच्या परिचित वयोवृद्ध व्यावसायिक मित्राने चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना नागपाडा परिसरात उघडकीस आली आहे. या हल्ल्यात अय्याज हा गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर जे. जे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या अहमद मोहम्मद हकीम या 62 वर्षांच्या वयोवृद्ध आरोपीस नागपाडा पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता नागपाडा येथील दुसरी पीर खान स्ट्रिट, म्युन्सिपाल्टी स्कूलजवळ घडली. अय्याज मिर्झा हा व्यावसायिक असून तो जे. जे मार्ग, हुजैरिया स्ट्रिट, नागोबा इमारतीमध्ये राहतो. अहमद हा त्याचा व्यावसायिक असून ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. काही महिन्यांपूर्वी अय्याजने अहमदला व्यवसायासाठी काही उसने पैसे घेतले होते, मात्र दिलेल्या मुदतीत त्याने त्याला पैसे परत केले नव्हते. याच कारणावरुन त्यांच्यात वाद सुरु होता. सोमवारी सायंकाळी अय्याज आणि अहमद यांची दुसरी पीर खान स्ट्रिट, म्युन्सिपाल्टी स्कूलसमोर भेट झाली होती. यावेळी अय्याजने अहमदकडे पुन्हा पैशांची मागणी केली होती. त्यावरुन त्यांच्यात पुन्हा वाद झाला होता.
याच वादातून रागाच्या भरात अहमदने त्याच्याकडील छोट्या चाकूने त्याच्या गालावर दोन ते तीन वार केले होते. अहमदकडून पुन्हा हल्ला होण्याची शक्यता असल्याने तो तेथून पळू लागला होता. यावेळी त्याने त्याचा पाठलाग केला, कुठे पळतोस, आज तुझा गळा कापतो अशी धमकी दिली होती. ही माहिती समजताच नागपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या अय्याजला पोलिसांनी जे. जे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु आहे. त्याच्या जबानीनंतर पोलिसांनी अहमद हकीमविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या 62 वर्षांच्या अहमदला पोलिसांनी नागपाडा परिसरातून अटक केली. अटकेनंतर त्याला बुधवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.