एक कोटीच्या ड्रग्जसहीत आरोपीस अटक

आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात एनसीबीला यश

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
५ मे २०२४
मुंबई, – एक कोटीच्या ड्रग्जसहीत टी. एम शफी या आरोपीस नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकार्‍यांनी अटक केली. ड्रग्जची विक्री करणारी ही आंतरराज्य टोळी असून या टोळीतील इतर आरोपींच्या अटकेसाठी आता एनसीबीने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईत या अधिकार्‍यांनी १६९.७ किलो वजनाचे कोडीन सिरप, अल्प्राझोलमच्या २२ हजार गोळ्या आणि नायट्राझेपामच्या १० हजार ३८० गोळ्यांचा साठा जप्त केला आहे. या गोळ्यांचा नशेसाठी वापर केला असून मार्केटमध्ये या गोळ्यांना प्रचंड मागणी असल्याचे बोलले जाते. अटकेनंतर शफीला लोकल कोर्टाने एनसीबी कोठडी सुनावली आहे.

फार्मास्टुटियल औषधांचा काहीजण मोठ्या प्रमाणात नशेसाठी वापर करत असून या गोळ्यांची तस्करी करणारी राज्यात एक टोळी कार्यरत आहे अशी माहिती मुंबई युनिटच्या एनसीबीच्या पथकाला मिळाली होती. ही टोळी अटकेच्या भीतीने त्यांचा माल एका गोदामात ठेवून नंतर त्याची इतर शहरात वितरण करत होती. त्यामुळे या टोळीची जास्तीत जास्त माहिती काढण्यावर एनसीबीने भर दिला होता. यावेळी रायगड जिल्ह्यांतील पनवेलमार्गे मुंब्रा परिसरातील एका गोदामात या ड्रग्जची साठवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या पथकाने मुंबईचे प्रमुख अमीत घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली टी. एम. शफीला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे १६९.७ किलो वजनाचे कोडीन सिरप आणि अल्प्राझोलमच्या १२ हजार ४०० गोळ्या या अधिकार्‍यांनी जप्त केल्या. त्याच्या चौकशीतून या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश एनसीबीला यश आले. त्याच्या माहितीवरुन या पथकाने मुंंब्रा येथील गोदामात छापा टाकला होता. या कारवाईत या अधिकार्‍यांनी अल्प्राझोलमच्या ९ हजार ६००, नायट्राझेपामच्या १० हजार ३८० गोळ्यांचा साठा जप्त केला. हा साठा रायगडहून आणण्यासाठी वाापरण्यात आलेले वाहनही या अधिकार्‍यांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन नंतर शफीला अटक करण्यात आली. याच गुन्ह्यांत तो एनसीबीच्या कोठडीत आहे. त्याच्या चौकशीत या गुन्ह्यांत सहभागी असलेल्या काही आरोपींची नावे समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी या अधिकार्‍यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page