मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० डिसेंबर २०२४
मुंबई, – दोन विविध कारवाईत मुंबई युनिटच्या नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकार्यांनी दोन तस्करांना अटक केली. या कारवाईत या अधिकार्यांनी कोट्यवधी रुपयांचे हायब्रीड, हायडोपोनिक गांजासह मेस्कलिनचा साठा जप्त केला आहे. या दोन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत ते दोघेही एनसीबी कोठडीत असल्याचे सांगण्यात आले. डार्कबेवच्या माध्यमातून ड्रग्ज तस्करीचा प्रकार सुरु असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
नाताळ सण आणि नवीन वर्षांच्या पार्श्वभूमीवर काही ड्रग्ज तस्कर पुन्हा सक्रिय झाले आहे. नवीन वर्षांच्या पार्ट्यांना ड्रग्जला प्रचंड मागणी असल्याने अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध एनसीबीने विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असतानाच काही ड्रग्ज तस्कर ड्रग्ज तस्करीसाठी विविध आयडिया शोधून काढत आहे. कॅरिअरच्या माध्यमातून विदेशातून हायड्रोपोनिक आणि हायब्रीड गांजा आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे या माहितीची शहानिशा करताना एनसीबीचे एक विशेष पथक छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते. तीन दिवसांपूर्वी आलेल्या पार्सलची पाहणी करताना या पथकाला एका पार्सलमध्ये कोट्यवधी रुपयांचा तेरा किलो गांजा सापडला. हा गांजा थाईलंड येथून मुंबईत पाठविण्यात आला होता. तो कोणी पाठविला, मुंबईत ते पार्सल कोणासाठी आले होते याची माहिती काढली जात आहे.
तपासात आलेल्या माहितीनंतर अन्य एका पथकाने कोल्हापूर येथे एका संशयिताला ताब्यात घेतले होते. त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले. या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस येताच त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. दुसर्या कारवाईत डार्क वेबच्या माध्यमातून ड्रग्ज तस्करीचा एनसीबीच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी एका पोस्ट कार्यालयात छापा टाकून या अधिकार्यांनी एक पार्सल ताब्यात घेतले होते. ते पार्सल ज्या व्यक्तीच्या नावाने आले होते, त्याला नंतर या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यावेळी त्याच्या घरात हायड्रोपोनिक गांजाची रोपे आढळून आले. तो बेडरुममधील एसीच्या माध्यमातून गांजाची रोप उगवत होता. हा प्रकार उघडकीस येताच त्याला गांजा तस्करीप्रकरणी या अधिकार्यांनी अटक केली.
या दोन्ही कारवाईत या अधिकार्यांनी १ किलो २३ ग्रॅम मेस्कलिन, १३ किलो हायब्रीड आणि ४८९ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजाचा साठा जप्त केला आहे. दोन्ही आरोपविरुद्ध एनडीपीएस कलमार्ंतत कारवाई केल्यानंतर त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना एनसीबी कोठडी सुनावली आहे.