एलओसीवर असलेल्या ड्रग्ज तस्कराला दिल्ली विमानतळावर अटक

पाच वर्षांपासून गुंगारा देत होता; बँकॉंकला जाताना कारवाई

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२ जून २०२४
मुंबई, – लुक आऊट नोटीस बजाविण्यात आलेल्या एका ड्रग्ज तस्कराला दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई युनिटच्या अधिकार्‍यांनी अटक केली. उमर सिद्धीक अब्दुल डायगोली ऊर्फ गॅप असे या आरोपीचे नाव असून तो केरळच्या कासारगोड, थुमिनाडूच्या बिलाल मंझीलचा रहिवाशी आहे. गेल्या पाच वर्षांपासून तो एनसीबीच्या अधिकार्‍यांना गुंगारा देत होता. विदेशात पळून जाण्याच्या तयारीत असल्याने त्याच्याविरुद्ध एलओसी बजाविण्यात आले होते, गुरुवारी बँकॉंकला जाण्याच्या तयारीत असतानाच त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.

मुंबई शहरात ड्रग्ज तस्करी करणारी एक टोळी कार्यरत असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी या पथकाने २०१९ रोजी अंधेरीतील एका हॉटेलमध्ये कारवाई करुन पाचजणांच्या टोळीला अटक केली होती. या पाचजणांमध्ये मोहम्मद मिनहाज, अल्फी मनजोत, अतुल रोकडे, झैनुद्दीन आणि जमशेद मलिक यांचा समावेश होता. या कारवाईत या अधिकार्‍यांनी २ किलो २७६ ग्रॅम वजनाचे चरस आणि प्रेगबलीन गोळ्यांचा साठा जप्त केला होता. क्रिकेटच्या किटच्या माध्यमातून हा ड्रग्जची तस्करी होणार होती, मात्र त्यापूर्वीच या पथकाने पाचही आरोपींना लाखो रुपयांच्या ड्रग्जसहीत अटक केली होती. या आरोपींच्या चौकशीतून उमर सिद्धीकचे नाव समोर आले होते. त्याच्यावर ड्रग्जचा साठा दोहा येथे पाठविण्याची जबाबदारी सोपविण्यात आल होती. याकामी या टोळीला अकरा लाख रुपये मिळणार होते, त्यामुळे उमरला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले होते. मात्र तो चौकशीला हजर न राहता पळून गेला होता.

गेल्या पाच वर्षांपासून तो सतत एनसीबीच्या अधिकार्‍यांना गुंगारा देत होता. तो विदेशात पळून जाण्याच्या तयारीत होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध या अधिकार्‍यांनी लुक आऊट नोटीस जारी केली होती. गुरुवारी ३० मेला उमर हा बँकॉकला जाण्यासाठी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. त्याच्याविरुद्ध एलओसी जारी करण्यात आल्याने त्याला इमिग्रेशन अधिकार्‍यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. ही माहिती नंतर एनसीबीच्या अधिकार्‍यांना देण्यात आली होती. या पथकाला त्याला अटक करुन दिल्लीतील लोकल कोर्टात हजर केले होते. यावेळी कोर्टाने त्याला पाच दिवसांची ट्रान्झिंट रिमांडवर पाठविले होते. त्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणल्यानंतर शनिवारी किल्ला कोर्टात हजर करणयत आले होते. यावेळी कोर्टाने त्याला एनसीबी कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page