मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
29 एप्रिल 2025
मुंबई, – सिनेअभिनेत्री नेहा मलिक हिच्या अंधेरीतील फ्लॅटमधून सुमारे 34 लाखांचे हिरेजडीत सोन्याचे दागिने चोरी करुन पळून गेलेल्या मोलकरीण महिलेस आंबोली पोलिसांनी अटक केली. शेनाज मुस्तफा शेख असे या महिलेचे नाव असून तिच्याकडून चोरीचे सर्व दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. चोरीचा गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासांत आरोपी महिलेस चोरीच्या मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना 25 एप्रिल ते 26 एप्रिल 2025 या कालावधीत अंधेरीतील जे. पी रोड, चार बंगला, अदानी हाईट्स अपार्टमेंटमध्ये घडली. याच अपार्टमेंटच्या ए विंगच्या फ्लॅट क्रमांक 1203 मध्ये मंजू किशोर मलिक ही 65 वर्षांची वयोवृद्ध तक्रारदार महिला तिची मॉर्डल आणि सिनेअभिनेत्री मुलगी नेहा मलिकसोबत राहते. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्याकडे मालाड येथे राहणारी शेनाज ही घरगडी म्हणून कामाला होती. सकाळी साडेसात वाजता घरी आल्यानंतर ती संपूर्ण काम करुन नऊ वाजता निघून जात होती. अनेकदा मंजू मलिक या तिला काम सांगून जवळच असलेल्या गुरुद्वारामध्ये जात होत्या. दोन महिने काम करत असल्याने शेनाजला घरातील मौल्यवान वस्तूसह पैशांविषयी माहिती होती. 24 एप्रिलला मंजू मलिक या नेहमीप्रमाणे गुरुद्वारामध्ये गेली होती.
घरी आल्यानंतर तिने तिचे दागिने बेडरुममध्ये ठेवले होते. दुसर्या दिवशी शेनाज ही कामावर आली नाही. त्यामुळे तिने तिला कॉल केला होता. मात्र तिचा मोबाईल बंद येत होता. काही वेळानंतर तिने बेडरुममधील दागिने पाहिले असता तिथे तिला दागिने दिसले नाही. घरात सर्वत्र शोध घेतल्यांनतर तिला कुठेच दागिने सापडले नव्हते. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने कपाटातील दागिन्यांची पाहणी केली होती. त्यात तिला कपाटातून 34 लाख 49 हजार रुपयांचे विविध सोने, हिरेजडीत दागिने मिसिंग असल्याचे दिसून आले. त्यांच्या घरी शेनाज शेख वगळता कोणीही येत नव्हते. त्यामुळे या दागिन्यांची चोरी शेनाजने केली असावी.
चोरीनंतर ती मोबाईल बंद करुन कामावर येणे बंद केले होते. हा प्रकार उघडकीस येताच मंजू मलिक यांनी आंबोली पोलिसांना घडलेला प्रकार शेनाज शेखविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत तिच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तिचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना शेनाजला मालाड येथून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत तिनेच या दागिन्यांची चोरी केल्याची कबुली दिली.
या कबुलीनंतर तिच्याकडून पोलिसांनी चोरीचे सर्व दागिने हस्तगत केले आहेत. याच गुन्ह्यांत अटक केल्यांनतर तिला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर तिच्या वतीने तिच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी होऊन मंगळवारी तिची जामिनावर सुटका करण्यात आली.