आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन नेपाळी प्रवाशांना अटक

बोगस पॅन-आधारकार्ड, निवडणुक ओळखपत्र बाळगणे महागात पडले

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ सप्टेंबर २०२४
मुंबई, – नेपाळला जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एका महिलेसह दोन नेपाळी नागरिकांना सहार पोलिसांनी अटक केली. चित्राकुमारी धनबहादूर तमंग आणि चंद्रू सौद हरिसिंग अशी या दोघांची नावे आहेत. कोलकाता, तामिळनाडू आणि पुण्यात वास्तव्यास असताना बोगस पॅनकार्ड, आधारकार्ड, निवडणुक ओळखपत्र बनवून स्वतजवळ बाळगणे या दोघांना चांगलेच महागात पडले आहे. या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत ते पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

चंद्रू हा गुरुवारी सकाळी सव्वासात वाजता नेपाळच्या काठमांडूला जाण्यासाठी आला होता. त्याच्याकडील पासपोर्ट आणि नेपाळचा बोर्डिंग पासची पाहणी केली असता इमिग्रेशन अधिकार्‍याला त्याच्यावर संशय आला होता. त्यामुळे त्याला भारतात कधी आला होता याबाबत विचारणा करण्यात आली. यावेळी त्याने तो पंधरा वर्षांपूर्वी भारतात आला असून तेव्हापासून तामिळनाडूच्या उटी शहरात राहत असल्याचे सांगितले. यावेळी त्याने भारतीय नागरिक असल्याचे आधारकार्ड, पॅनकार्ड, भारतीय मतदान पत्र दाखविले. चौकशीत तो नेपाळचा नागरिक होता, तरीही त्याने बोगस पॅनकार्ड, आधारकार्ड आणि मतदान ओळखपत्र बनविले होते. या दस्तावेजच्या मदतीने त्याने भारतीय पासपोर्ट प्राप्त केले होते. चौकशीत तो वीस वर्षांपूर्वी नेपाळहून भारतात आला होता. काही महिने त्याने हॉटेलमध्ये कुक म्हणून काम केले. नंतर त्याने स्वतचा फास्ट फुडचा व्यवसाय सुरु केला होता. याच दरम्यान त्याची एका व्यक्तीशी ओळख झाली होती. त्यानेच त्याला भारतीय पॅनकार्ड, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र बनवून दिले होते. दिल्ली आणि बंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन तो अनेकदा नेपाळला गेला होता. तिथेच त्याची पत्नी आणि तीन मुले राहतात. नेपाळचा नागरिक असताना त्याने खोटी माहिती सांगून भारतीय दस्तावेज बनून भारतीय निवडणुक आयोगाची फसवणुक केली होती.

यापूर्वी चित्राकुमारी या महिलेस इमिग्रेशन अधिकार्‍यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मंगळवारी १० सप्टेंबरला ती काठमांडूला जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली होती. यावेळी तिने इमिग्रेशन अधिकार्‍यांना तिचे भारतीय निवडणुक ओळखपत्र, पॅनकार्ड आणि आधारकार्ड दाखविले होते. चौकशीत २४ वर्षापूर्वी ती तिच्या पतीसोबत भारतात आली होती. तेव्हापासून ती कोलकाता येथे वास्तव्यास होती. २००२ चित्राकुमारी तिच्या पतीसोबत पुण्यात नोकरीसाठी आली होती. तेव्हापासून ते पुण्यात वास्तव्यास आहे. याच दरम्यान तिने भारतीय निवडणुक ओळखपत्र आणि इतर भारतीय बोगस दस्तावेज बनविले होते. नेपाळी नागरिक असताना तिने स्वतला भारतीय नागरिक असल्याचे सांगून तिच्या नावाने बोगस दस्तावेज बनविले होते. अशा प्रकारे तिने भारतीय निवडणुक आयोगासह इतर शासकीय विभागाची फसवणुक केली होती. त्यामुळे तिला ताब्यात घेऊन सहार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. याप्रकरणी मिनाकुमारी तमंग आणि चंद्रु हरिसिंग यांच्याविरुद्ध फसवुणकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत नंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांना बोगस दस्तावेज कोणी बनवून दिले, त्यांचा आता पोलीस शोध घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page