कंपनीच्या वरिष्ठ उपाध्याक्षाची फसवणुकीप्रकरणी तिघांना अटक
शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाने २२ लाखांना गंडा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – वरळीतील एका नामांकित कंपनीत वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या अधिकार्यांची फसवणुक केल्याप्रकरणी तिघांनाही उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. नितीन गिरीधर चेंदवणकर, उदय शांताराम साळवी आणि राजेश पोपट सोनावणे अशी या तिघांची नावे आहेत. अटकेनंतर या तिघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने या तिघांची जामिनावर सुटका केली. शेअरमार्केटमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा देतो असे सांगून या टोळीने या अधिकार्याची सुमारे २२ लाखांची फसवणुक केल्याचा आरोप आहे. या गुन्ह्यांत समीर, कबीर, अमन आणि हर्ष नावाच्या चौघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांचा पोलिसाकडून शोध सुरु आहे.
विनय दिनानाथ तिवारी हे त्यांच्या कुटुंबियांसोबत मालाड येथील हाजी बापू रोड, रविराज अपार्टमेंटमध्ये राहतात. वरळतील एका नामांकित कंपनीत गेल्या सतरा वर्षांपासून ते वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून काम करतात. शेअरमार्केटमध्ये त्यांनी गुंतवणुक केली असून ते अधूनमधून शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक करत असतात. ११ मार्च २०२४ रोजी फेसबुक अकाऊंट पाहत असताना त्यांना अपोलो बिझनेस स्कूल नावाच्या एका शेअरमार्केट ऍनालिसीससंदर्भातील माहिती दिसली होती. ही लिंक ओपन केल्यानंतर त्यांचा मोबाईल क्रमांक एका व्हॉटअप गु्रपमध्ये ऍड करण्यातआले होते. या ग्रुपमध्ये जवळपास १३० हून अधिक सभासद होते. त्यात शेअरमार्केटबाबत ऑडिओ आणि व्हिडीओच्या माध्यमातून क्लास घेतले जात होते. ग्रुप ऍडमिन अरुनिमा रॉय ही सभासदांना शेअरमार्केटमधील माहिती देताना अनेकांना गुंतवणुक करण्यासोबत त्यातून सभासदांना किती रुपयांचा फायदा होईल याची माहिती देत होती.
अशाच प्रकारे तिने त्यांना शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले होते. त्यामुळे तिच्यावर विश्वास ठेवून त्यांनी शेअरमध्ये गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला फायदा झाला होता. त्यापैकी सुमारे सव्वादोन लाख रुपये त्यांनी त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केले होते. ही रक्कम बँक खात्यात जमा झाल्याने त्यांना तिच्यावर विश्वास बसला होता. त्यामुळे त्यांनी तिच्या सांगण्यावरुन ११ मार्च ते ३ मे २०२४ या कालावधीत २२ लाख २२ हजार ४७० रुपयांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना ४० लाख ८८ हजार ०५५ रुपयांचा मूळ रक्कमेसह फायदा झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे त्यांनी ती रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्याचा प्रयत्न केला, मात्र ही रक्कम ट्रान्स्फर झाली नाही. याबाबत त्यांनी अरुनिमा रॉयकडे विचारणा केली असता तिने त्यांना आधी ३ लाख १८ हजार रुपये टॅक्स भरावा लागेल. टॅक्सची रक्कम जमा होताच त्यांना त्यांची रक्कम ट्रान्स्फर करता येईल असे सांगितले. तोपर्यंत त्यांना ही रक्कम मिळणार नाही किंवा ट्रान्स्फर करता येणार नाही असे सांगितले.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सायबर हेल्पलाईन १९३० आणि उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेलमध्ये तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संबंधित सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी ४१९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२० बी, ३४ भादवी सहकलम ६६ (सी), (डी) आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी नितीन चेंदवणकर, उदय साळवी आणि राजेश सोनावणे या तिघांनाही संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले. चौकशीत या गुन्ह्यांत या तिघांचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर या तिघांनाही पोलिसांनी अटक केली. या तिघांच्या बँक खात्यात फसवणुकीची रक्कम जमा झाली होती. त्यानंतर त्यांनी ती रक्कम गुन्ह्यांतील सायबर ठगांना दिल्याचे उघडकीस आले. या तिघांनाही ४७ भान्यास कलमांतर्गत नोटीस देण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यांची बोरिवलीतील लोकल कोर्टाने जामिनावर सुटका केली.