प्राध्यापिकेला १.८० कोटीचा गंडा घालणार्या दुकलीस अटक
चांगला परताव्या आमिषाने शेअर ट्रेडिंगच्या नावाने फसवणुक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३० सप्टेंबर २०२४
मुंबई, – गोरेगाव येथे राहणार्या एका ७१ वर्षांच्या निवृत्त प्राध्यापिका महिलेची एक कोटी ऐंशी लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी दोन सायबर ठगांना उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. सौरभ भानूभाई संगानी आणि गुंजन भिकूभाई अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांनी त्यांच्या इतर सहकार्यांच्या मदतीने तक्रारदार महिलेला चांगला परतावा देतो असे सांगून शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
तक्रारदार महिला ही गोरेगाव येथे राहत असून ती एका नामांकित कॉलेजमधून प्राध्यापिका म्हणून निवृत्त झाली आहे. त्यांना शेअर ट्रेडिंगविषयी थोडा फार अनुभव असून त्या कधी कधी शेअरमार्केटमध्ये ट्रेडिंग करतात. फेब्रुवारी महिन्यांत त्यांना फेसबुकवर एक शेअर ट्रेडिंगविषयी जाहिरात दिसली होती. त्यामुळे त्यांनी ती जाहिरात ओपन केली होती. याच दरम्यान तिला एका अज्ञात व्यक्तीने व्हॉटअप ग्रुपमध्ये ऍड केले होते. या ग्रुपमध्ेये ट्रेडिंग, कॅन्डलचा कसा वापर करावा, आयपीओ आणि कोणत्या स्टॉकमध्ये गुंतवणुक केल्यास त्याचा फायदा होईल याबाबत माहिती दिली जात होती. ग्रुपमध्ये अनेक सभासद त्यांच्या शेअर ट्रेडिंगमधील फायद्याची माहिती स्क्रिनशॉटद्वारे देत होते. त्यामुळे ती काही दिवस ग्रुपबाबत निरीक्षण करत होती. याच दरम्यान राजीव अंबानी नावाच्या एका व्यक्तीने तिला संपर्क साधला होता. त्याने तो एका खाजगी कंपनीत शेअर मार्केट अनालिस्ट म्हणून काम करत होता. सध्या तो निवृत्त झाला असून तो लोकांना शेअरमार्केटबाबत माहिती देतो. त्याने तिला काही कंपन्यांमध्ये गुंतवणुक करण्याचा सल्ला देताना तिला तीस टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे तिने राजीवने पाठविलेली लिंक ओपन केले होते. लिंक ओपन केल्यांनतर तिने स्वतचे खाते उघडले होते.
राजीव व तिची सहाय्यक लक्ष्मी हिच्या सांगण्यावरुन तिने २६ मार्च ते २३ एप्रिल २०२४ या कालावधीत विविध शेअरमध्ये १ कोटी ८० लाख ५२ हजार ७३३ रुपयांची गुुंतवणुक केली होती. काही दिवसांनी तिला तिच्या गुंतवणुकीवर २० कोटी ५० लाख ३० हजार रुपयांचा फायदा झाल्याचे ऍपच्या स्क्रिनवर दिसले होते. त्यामुळे तिने तिचे काही शेअर विकून पैसे तिच्या बँक खात्यात पाठविण्याची विनंती केलीद होती. यावेळी लक्ष्मीने तिला पैसे ट्रान्स्फरसाठी काही रक्कम आधी भरावी लागेल असे सांगितले. यावेळी तिने तिला मिळणार्या रक्कमेतून ही रक्कम डेबीट करुन घेण्यास सांगितले. मात्र लक्ष्मीने टॅक्सची रक्कम भरल्याशिवाय तिच्या बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर होणार नाही असे स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे तिने तिच्या गुंतवणुक केलेल्या रक्कमेची मागणी सुरु केली होती. मात्र त्यांनी तिला पैसे पाठविले नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने सायबर हेल्पलाईनसह सायबर सेल पोलिसांत तक्रार केली हातेीे.
या तक्रारीनंतर उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर विभागाने अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी सौरभ आणि गुंजन या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस आला आहे. फसवणुकीची काही रक्कम या दोघांच्या बँक खात्यात जमा झाले होते. त्यानंतर या दोघांनाही अटक करुन बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.