बँकेचा कर्मचारी असल्याची बतावणी करणारा भामटा गजाआड
बोगस व्हॉटअप, शेअर ट्रेडिंग अॅपच्या माध्यमातून गंडा घातला
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
31 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – शहरातील एका नामांकित खाजगी बँकेचा कर्मचारी असल्याची बतावणी करुन बोगस व्हॉटअप ग्रुप आणि शेअर ट्रेडिंग अॅप तयार करुन एका व्यक्तीला एकोणीस लाखांना गंडा घातल्याप्रकरणी सायबर गुन्हेगार टोळीशी संबंधित भामट्याला उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. ऋत्विक दिपक जाधव असे या 25 वर्षीय भामट्याचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी तीन मोबाईल, तीन सिमकार्ड, चार डेबीट कार्ड, पाच चेकबुक, तीन पासबुक, दोन पॅनकार्ड, करारनामा आणि चार नोंदवही आदी मुद्देमाल जप्त केला आहे. बँकेच्या माध्यमातून शेअरमध्ये गुंतवणुक करुन चांगला परतावा देण्याच्या आमिषाने ही फसवणुक करण्यात आली होती. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
यातील तक्रारदार उत्तर मुंबईतील रहिवाशी असून एका खाजगी कंपनीत काम करतात. मार्च महिन्यांत त्यांना अज्ञात व्यक्तीने एका नामांकित बँकेच्या व्हॉटअप ग्रुपमध्ये अॅड केले होते. त्यात शेअर ट्रेडिंगची माहिती अपलोड केली होती. कुठल्या शेअरमध्ये गुंतवणुक केली की त्यात त्यांना फायदा होईल याची माहिती सांगून त्यांना शेअरमध्ये गुंतवणुकीसाठी प्रवृत्त करण्यात आले होते. त्यांच्या या आमिषाला बळी पडून त्यांनी शेअरमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांना शेअर ट्रेडिंगचा एक बोगस अॅप पाठविण्यात आला होता.
या अॅपद्वारे त्यांना मार्च ते एप्रिल 2025 या कालावधीत विविध शेअरमध्ये बँकेच्या माध्यमातून 19 लाख 56 हजार 240 रुपये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला फायदा झाल्याचे भासविण्यात आले होते, मात्र ही रक्कम त्यांना त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करता येत नव्हती. याबाबत विचारणा करुनही संबंधितांकडून त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. त्यांना आणखीन काही रक्कम शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास सांगण्यात येत होते. मात्र त्यांनी शेअरमध्ये पैसे गुंतवणुक करण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्यांनी त्यांना प्रतिसाद देणे बंद केले होते.
फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी उत्तर सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड, सहाय्यक पोलीस आयुक्त इरफान शेख, प्रभारी पोलीस निरीक्षक किरण आहेर यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पांचागणे, सुदर्शन पाटील, पोलीस हवालदार विक्रांत कानडे, किरण वसईकर, सुनिल नाडगौडा, रवी पाटील, अक्षय साळवे यांनी तपास सुरु केला होता.
तपासात अज्ञात सायबर ठगांनी बोगस व्हॉटअप ग्रुप, शेअर टे्रडिंग अॅप बनवून तक्रारदारांना शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन ही फसवणुक केल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती, त्या सर्व बँक खात्याची माहिती काढण्यास पोलिसांनी सुरुवात केली होती. त्यातील एका बँक खात्याचा खातेदार ऋत्विक जाधव असल्याचे उघडकीस आले होते. त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्यानेच वेगवेगळ्या बँक खात्यात सायबर ठगांसाठी खाती उघडल्याचे तपासात उघडकीस आले. या मोबदल्यात त्याला सायबर ठगांकडून भरघोस पैशांचा मोबदला मिळाला होता.
या बँक खात्यात भारतातील विविध ऑनलाईन फसवणुकीचे लाखो रुपये जमा झाल्याचे निष्पन्न झाले असून संबंधित सर्व बँक खाती फ्रिज करण्यात ाअले आहे. बेनिफिशरी बँक खात्यात ही रक्कम जमा झाल्यानंतर आरोपी ती रक्कम द्वितीय स्तरावरील बँक खात्यात वळती करत होता. त्यानंतर त्या बँक खात्यातून ती रक्कम अन्य बँक खात्यात, मोबाईल क्रमांकावर ट्रान्स्फर केली जात होती. आरोपींकडून बँकेशी संबंधित डेबीट कार्ड, चेकबुक, पॅनकार्ड, करारनामा, नोंदवह्या तसेच प्रत्येकी तीन मोबाईल व सिमकार्ड पोलिसांनी जप्त केले आहेत. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.