विविध कोर्ससाठी घेतलेल्या दहा लाखांचा अपहार करुन फसवणुक

चौदा विद्यार्थ्यांची फसवणुक झाल्याचे उघड; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
८ एप्रिल २०२४
मुंबई, – विविध कोर्ससाठी घेतलेल्या सुमारे दहा लाखांचा अपहार करुन विद्यार्थ्यांची फसवणुक झाल्याचा प्रकार दहिसर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका खाजगी इस्टिट्यूटच्या चौघांविरुद्ध दहिसर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. प्रणिता आंधे, राजेश घातड, अल्मास मुजावर आणि लक्ष्मण आंधे अशी या चौघांची नावे आहेत. या चौघांनी आतापर्यंत चौदा विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या पैशांचा अपहार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे या चौघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या टोळीने अशाच प्रकारे इतर काही विद्यार्थ्यांची फसवणुक केल्याचे बोलले जात असून फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

२२ वर्षांची राधिका शिवनाथ शिंदे ही मिरारोडच्या पेनकरपाडा, ओम दिप चाळीत राहत असून तिची आई आरोग्यसेविका तर वडिल एका खाजगी कंपनीत कामाला आहे. ती सध्या शिक्षण घेत आहे. तिच्या एका मैत्रिणीकडून तिला दहिसर येथील भरुचा रोड, कृष्णा शॉपिंग सेंटरमध्ये नर्सिंग कोर्स चालत असल्याची माहिती समजली होती. त्यामुळे ती जनरल नर्सिंग मिडवायफ्री या कार्यालयात चौकशीसाठी गेली होती. यावेळी तिला कोर्सची फि सत्तर हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ती फॉर्म घेऊन आली होती. जुलै २०२२ रोजी तिला लक्ष्मण भेटला होता. त्याने तिला आता प्रवेश घेतल्यास तिला महाराष्ट्र बोर्डमार्फत प्रवेश मिळेल नाहीतर तिची परिक्षा पुण्यातून होईल असे सांगून तिच्यावर प्रवेशासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिने तीन वर्षांच्या कोर्ससाठी तिचे दहावी, बारावीचे मार्कशीटसह तिची इतर कागदपत्रे देऊन प्रवेश घेतला होता. पैसे भरल्यानंतर तिला रितसर पावती देण्यात आली होती. प्रवेशाच्या वेळेस तिला तीन महिन्यानंतर कोर्सची माहिती पुस्तिका देण्यात येईल असे सांगणयात आले. मात्र तीन महिने उलटूनही तिचा प्रवेश झाला आहे की नाही याबाबत काहीच अधिकृत माहिती देण्यात आली नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने संबंधित इन्स्टिट्यटूटची माहिती काढली. यावेळी तिला प्रणिता आंधे आणि राजेश घाटड यांच्या नावाने ते इन्स्टिट्यूट रजिस्ट्रर असल्याचे समजले. लक्ष्मण हा प्रणिताचा पती असून त्याच्यासह अल्मास हिने तिच्यासह इतर विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी पैसे घेतले होते.

जानेवारी २०२४ रोजी तिच्यासह मुंबई आणि ठाण्यातील पंधरा विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी बंगलोर येथे नेण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत लक्ष्मण, दुर्गेश आणि अल्मास मॅडम उपस्थित होते. मात्र तिथे कोणाचीही परिक्षा घेण्यात आली नाही. वेगवेगळे कारण सांगून परिक्षा रद्द झाल्याचे सांगून या सर्वांना पुन्हा मुंबईत आणण्यात आले. त्यानंतर त्यांना फे्रबुवारी किंवा एप्रिल महिन्यांत परिक्षा होईल असे सांगितले. मात्र त्यांची परिक्षा झाली नाही. काही दिवसांनी लक्ष्मणने परिक्षा झाली नाहीतर तिला पावणेतीन लाख रुपये परत करण्याचे आश्‍वासन दिले, मात्र दिलेल्या मुदतीत त्याने प्रवेशाच्या वेळेस घेतलेले पैसे परत केले नाही. अशा प्रकारे या चौघांनी विविध कोर्ससाठी प्रवेश देण्याचे आमिष दाखवून पंधरा चौदा विद्यार्थ्यांकडून दहा लाख सात हजार रुपये घेऊन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच राधिका शिंदे यांनी दहिसर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रार अर्जानंतर पोलिसांनी प्रणिता आंधे, राजेश घातड, अल्मास मुजावर आणि लक्ष्मण आंधे या चौघांविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page