ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील दुकलीस अटक
सायबर ठगांसाठी उघडलेल्या बँक खात्यातील ६० लाख गोठविले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ मार्च २०२४
मुंबई, – शेअर्समध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने एका महिलेची सात लाख रुपयांची ऑनलाईन फसवणुक केल्याच्या गुन्ह्यांतील दुकलीस ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. अरबाज अहमद आयुब शेख आणि सरफुद्दीन शेख अशी या दोघांची नावे आहेत. यातील अरबाजचा मटण विक्रीचा व्यवसाय असून त्याने फसवणुकीच्या गुन्ह्यांतील सायबर ठगांना बँकेत खाते उघडून दिल्याचे तपासात उघडकीस आले. त्याने उघडलेल्या बँक खात्यात लाखो रुपये ट्रान्स्फर झाले असून त्यापैकी साठ लाखांची कॅश गोठविण्यात पोलिसांना यश आले आहे.
यातील तक्रारदार महिला शिक्षिका असून ती अंधेरी येथे तिच्या कुटुंबियांसोबत राहते. गेल्या वर्षी तिला फेसबुकवर शेअर मार्केट गुंतवणुकीसंदर्भात एक जाहिरात दिसली होती. त्यात शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक केल्यास आकर्षक परवाता मिळत असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे तिने या जाहिरातीच्या टेलिग्राम ऍपवर जाऊन स्वतचा आयडी ओपन केला होता. त्यात तिला कुठल्या कंपनीचे शेअर खरेदी केल्यानंतर किती फायदा होईल याबाबतची ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून माहिती दिली जात होती. यावेळी समोरील व्यक्तीने तिला चांगला परतावा मिळेल अशी बतावणी करुन गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून तिने सुमारे सात लाख रुपयांची गुंतवणुक केली होती.
मात्र गुंतवणुक केलेली रक्कम तिला ऍप्सच्या माध्यमातून काढता येत नव्हती. त्यामुळे तिने संबंधित व्यक्तीला विचारणा केली असता त्याने पैसे काढण्यासाठी तिला विविध चार्जेस म्हणून काही रक्कम भरण्यास सांगितले होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने घडलेला प्रकार ओशिवरा पोलिसांना सांगून अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता.
पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन पाटील यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक शिवाजी भाडवलकर, पोलीस उपनिरीक्षक शरद देवरे, अशोक कोंडे, विक्रम सरनोबत यांनी तपासाला सुरुवात केली होती. ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती, त्या सर्व बँक खात्याची माहिती काढण्यात आली होती. ते बँक खाते जोगेश्वरीतील एका मटण विक्री दुकानाच्या नावाने होते. त्यामुळे पोलीस तिथे मटण विक्रीच्या नावाने गेले होते. पार्टीसाठी मटण हवे आहे असे सांगून पोलिसांनी अरबाजची माहिती काढली. या माहितीनंतर दुकानात आलेल्या अरबाजला पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्याच्या चौकशीत सरफुद्दीन याचे नाव समोर आले होते. त्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान या गुन्ह्यांत दोघांचाही सहभाग उघडकीस आला होता. ते दोघेही फसवणुकीच्या गुन्ह्यांतील सायबर ठगांना विविध बँकेत बँक खाते उघडून देण्यात मदत करत होते. या दोघांनी आतापर्यंत सायबर ठगांना दहाहून अधिक खाते उघडून दिले होते. त्यापैकी चार बँक खात्यातील सुमारे साठ लाख रुपयांची कॅश गोठविण्यात पोलिसांना यश आले आहे.