ऑनलाईन वाईन मागविणे अॅडमीन हेडला चांगलेच महागात पडले
वाईनसाठी घेतलेल्या पावणेसात लाखांचा सायबर ठगाकडून अपहार
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – विलेपार्ले येथील एका खाजगी ग्रुप अॅडमीनला ऑनलाईन वाईन मागविणे चांगलेच महागात पडले. वाईनसाठी आधी पेमेंट करण्यास प्रवृत्त करुन अज्ञात सायबर ठगाने सुमारे पावणेसात लाखांचा अपहार केला. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून या ठगाचा शोध सुरु केला आहे. ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली आहे, त्या बँक खात्याची माहिती काढून संबंधित ठगाच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
भावेश माणिक मेहता हे दादर येथे राहत असून विलेपार्ले येथील एका खाजगी कंपनीत अॅडमीन हेड म्हणून काम करतात. बुधवारी 15 ऑक्टोंबरला दिवाळी सणानिमित्त त्यांच्या कंपनीचा एक कार्यक्रम होता. त्यांना कंपनीच्या कर्मचार्यांसाठी ऑनलाईन वाईनची ऑर्डर करायची होती. त्यामुळे त्यांनी सोशल साईटवर जवळच्या वाईन शॉपचा मोबाईल क्रमांक सर्च केलाद होता. यावेळी त्यांना एका वाईन शॉपचा मोबाईल क्रमांक सापडला होता.
या मोबाईलवर संपर्क साधल्यानंतर समोरुन बोलणार्या अजयकुमारने त्यांना त्यांच्या वाईनचे एकूण पेमेंट नऊ लाख रुपये होईल सांगून त्यांना 50 टक्के पेमेंट आधी करण्याची तसेच डिलीव्हरीनंतर उर्वरित 50 टक्के करण्यास सांगितले. त्याने त्यांना वाईन शॉपचे इनव्हाईसमधील जीएसटी क्रमांक पाठविला होता. त्याची शहानिशा केल्यानंतर पी के वाईन शॉपचे त्यांचे रिटर्न आणि जीएसटी वेळेवर भरल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे बँक खात्याची डिटेल्स घेतली होती. या डिटेल्सनंतर त्यांनी त्याला साडेचार आणि नंतर सव्वादोन लाख रुपयांचे पेमेंट केले होते. या पेमेंट स्क्रिनशॉट त्यांनी त्याला पाठवून दिले होते.
यावेळी अजयकुमारने पेमेंट मिळाल्याचे सांगून त्यांना डिलीव्हरी करण्याचे आश्वासन दिले, मात्र त्याने त्यांना वाईनची डिलीव्हरी केली नाही. विचारणा केली असता त्याने त्यांना पार्सल गेले असून लवकरच त्यांना त्यांचे पार्सल मिळेल असे सांगितले, मात्र रात्री साडेआठ वाजल्यानंतर त्यांचा डिलीव्हरी बॉय आला नव्हता. त्यामुळे त्यांनी पुन्हा विचारणा केली असता त्याने गाडीत बिघाड झाल्याचे सांगितले. तो त्यांना वेगवेगळे कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होता.
ऑनलाईन पेमेंट करण्यास प्रवृत्त करुन अजयकुमार या ठगाने त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी विलेपार्ले पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अजयकुमार नाव सांगणार्या व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ऑनलाईन वाईन मागविणे तक्रारदार भावेश शहा यांना चांगलेच महागात पडले.