मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० डिसेंबर २०२४
मुंबई, – अंधेरीतील एका डॉक्टरच्या घरी चोरी करणार्या नोकराला ओशिवरा पोलिसांनी अटक केली. सुधांशू बाबूनारायण यादव असे या नोकराचे नाव असून त्याच्याकडून लवकरच चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला जाणार आहे. संपूर्ण कुटुंबिय लोणावळा येथे गेल्यानंतर सुधांशूने कपाटातील सुमारे साडेआठ लाखांच्या हिरेजडीत सोन्याचे दागिने आणि कॅशवर हातसफाई केल्याचे तपासात उघडकीस आले. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली असून याच गुन्ह्यांत त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
राजेंद्र मोतीलाल सरावगी हे ७३ वर्षांचे वयोवृद्ध व्यवसायाने डॉक्टर असून ते अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स, ओबेरॉय स्काय गार्डन अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांची पत्नी रेश्मी, मुलगा मोहीत आणि सून रुपा असे सर्वजण डॉक्टर आहेत. त्यांचा स्वतचा सरोगी नावाचे एक हॉस्पिटल आहे. त्यांच्याकडे सुधांशूसह एक महिला मोलकरीण म्हणून काम करतात. सुधांशू हा जोगेश्वरीतील हिरापन्ना शॉपिंग मॉल, आनंदनगर परिसरात राहतो. दिवसा काम करुन तो रात्री त्याच्या घरी जात होता. २५ डिसेंबरला मोहित आणि रुपा यांचा लग्नाचा वाढदिवस होता. त्यामुळे संपूर्ण कुटुंबिय सुट्टीसाठी लोणावळा येथे गेले होते. यावेळी त्यांच्या घरी सुधांशू हा एकटाचा होता. काम संपल्यानंतर तो त्याच्या घरी गेला होता.
२७ डिसेंबरला ते सर्वजण लोणावळा येथून घरी आले होते. सायकाळी त्यांनी कपाट उघडले असता त्यांना कपाटातून साडेचार लाखांचे हिरेजडीत सोन्याचे दागिने, चार लाख रुपयांची कॅश असा साडेआठ लाखांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी दोन्ही नोकरांकडे चौकशी केली होती. यावेळी या महिलेने ती कामावर आल्याचे सांगून सुधांशू आल्यानंतर घरी गेल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी सुधांशूकडे विचारणा केली असता त्याने ही चोरी केल्याची कबुली दिली. मात्र चोरीच्या दागिन्यांबाबत माहिती देण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्यांनी ओशिवरा पोलिसांना ही माहिती सांगून त्यांचा नोकर सुधांशू यादवविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच शनिवारी सुधांशू याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला रविवारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्याच्याकडून लवकरच चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला जाणार आहे.