लग्नाच्या आमिषाने २६ वर्षांच्या ऍक्टर तरुणीवर लैगिंक अत्याचार
गुन्हा दाखल होताच वॉण्टेड दिग्दर्शक प्रियकराला अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३० मार्च २०२४
मुंबई, – लग्नाच्या आमिषाने एका २६ वर्षांच्या ऍक्टर तरुणीवर लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी दिग्दर्शक प्रियकराला ओशिवरा पोलिसांनी अटक केलीम अभिजीत संतोषकुमार गौरव असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा बिहारचा रहिवाशी आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने ३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अभिजीतने पिडीत तरुणीच्या लॅपटॉप आणि मोबाईलचा डाटा चोरी करुन तो सोशल मिडीयावर व्हायरल करुन तिची बदनामी करण्याची धमकी दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
पिडीत तरुणी ही मूळची जम्मूची रहिवाशी असून ती सध्या गोरेगाव परिसरात राहते. अभिनय क्षेत्रात कार्यरत असलेल्या या तरुणीने काही ड्रामा आणि शॉर्टफिल्ममध्ये काम केले आहे. विलेपार्ले येथील नामांकित मंदिराच्या ड्रॉमा शोमध्ये ती सध्या काम करत होती. फेब्रुवारी २०२३ रोजी ती एका शॉर्टफिल्मसाठी बिहारला गेली होती. तिथेच तिची ओळख अभिजीतसोबत झाली होती. यावेळी त्यांची चांगली मैत्री झाली होती. मैत्रीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले होते. त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केले होते. याच दरम्यान तिने त्याच्यासाठी यूट्यूबवरील दोन शॉर्टफिल्म केल्या होत्या. त्याचे दिग्दर्शन अभिजीतने केले होते. त्यामुळे तिचा त्याच्यावर विश्वास बसला होता. १७ मे ते १३ ऑगस्ट २०२३ या कालावधीत विरोध असतानाही लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यावर पाच ते सहा लैगिंक अत्याचार केला होता. अभिजीतवर विश्वास असल्याने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. काही दिवसांनी ती एका शॉर्टफिल्मसाठी दिल्लीला गेली होती. तिथे तिची राहण्याची व्यवस्था नसल्याने अभिजीतने तिला त्याच्या एका नातेवाईकाच्या घरी ठेवले होते. याच फ्लॅटमध्ये एकत्र राहत असताना त्याने तिच्या लॅपटॉप आणि मोबाईलमधील सर्व महत्त्वाचा डाटा चोरी केला होता. त्यात तिचे काही पर्सनल गोष्टींचा समावेश होता. हा डाटा सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत तो तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. काही दिवसांनी तिने त्याला लग्नाविषयी विचारणा केली होती. यावेळी त्याने तिच्याशी लग्न करण्यास स्पष्टपणे नकार दिला होता. त्यातून त्यांच्यात खटके उडू लागले होते.
अभिजीतकडून फसवणुक झाल्याने ती प्रचंड मानसिक तणावात होती. त्यामुळे ती दिल्लीतून तिच्या जम्मू येथील घरी निघून गेली होती. तिथे तिने तिच्या आईसह भावाला घडलेला प्रकार सांगितला. यावेळी त्यांनी तिला मानसिक आधार देत अभिजीतविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. मुंबईत आल्यानंतर तिने ओशिवरा पोलीस ठाण्यात अभिजीत गौरवविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीत तिने अभिजीतने शारीरिक संबंधासाठी तिला लग्नाचे आमिष दाखवून तिची फसवणुक केली तसेच तिचा डाटा चोरी करुन तो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिची बदनामीचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत त्याच्याविरुद्ध कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानंतर अभिजीतविरुद्ध लैगिंक अत्याचारासह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. याच गुन्ह्यांत त्याला शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.