ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील बिहारी ठगाला अटक
पॅनकार्ड अपडेटच्या नावाने अनेकांची फसवणुक केल्याचे उघड
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२ जून २०२४
मुंबई, – ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील एका बिहारी ठगाला पायधुनी पोलिसांनी अटक केली. निरंजनकुमार तरणी मंडल असे या ठगाचे नाव असून तो मूळचा बिहारचा रहिवाशी आहे. पॅनकार्ड अपडेटच्या नावाने निरंजनकुमारसह त्याच्या सहकार्यांनी अनेकांची फसवणुक केली असून फेब्रुवारी महिन्यांत त्यांनी एका महिलेची सुमारे पाच लाखांची फसवणुक केल्याचे उघडकीस आले होते. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
वीना सुभाषकुमार बासू ही महिला मशिदबंदर येथे दिव्यांग मुलांसाठीचे थेरपी सेंटर चालविते. २६ फेब्रुवारी २०२४ ती तिच्या कार्यालयात होती. यावेळी एका अज्ञात मोबाईलवरुन तिला एक मॅसेज आला होता. त्यात तिच्या बँकेचे डेबीट कार्ड ब्लाक झाले आहे. कार्ड अनब्लॉक करण्यासाठी तिला पॅनकार्ड अपडेट करावे लागेल असे सांगून एक लिंक पाठविण्यात आली होती. ही लिंक ओपन केल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर एक फॉर्म आला होता. त्यात तिने तिच्या डेबीट कार्डसह पॅनकार्ड आणि इतर वैयक्तिक माहिती अपलोड केली होती. त्यानंतर तिच्या मोबाईलवर एक ओटीपी क्रमांक आला होता. ते ओटीपी सबमीट केल्यानंतर काही वेळात तिच्या बँक खात्यातून सुमारे पाच लाख रुपये डेबीट झाले होते. एकूण चार ऑनलाईन व्यवहारातून ही रक्कम ट्रान्स्फर करण्यात आली होती. फसवणुकीचा हा प्रकार निदर्शनास येताच तिने पायधुनी पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी बिहारहून निरंजनकुमार मंडल याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक करुन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले होते. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्याच्या चौकशीतून अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.