पार्टटाईम जाँबच्या नावाने महिला व्यावसायिकाची फसवणुक
बारा लाखांच्या फसवणुकीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
26 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – पार्टटाईम जाँबच्या नावाने एका महिला व्यावसायिकाची तीनजणांच्या टोळीने सुमारे बारा लाखांची फसवणुक केली. याप्रकरणी तिन्ही आरोपीविरुद्ध मध्य प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. त्यात एका महिलेचा समावेश असून या महिलेनेच तिला हॉटेलला रिव्ह्यू आणि कमेंटवर चांगले कमिशन देण्याचे आमिष दाखवून ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. आरोपींच्या अटकेसाठी सायबर सेल पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
स्मिता नितीनकुमार शुक्लाही महिला दादर येथे राहत असून तिची स्वतची एक खाजगी कंपनी आहे. 20 ऑक्टोंबरला तिच्या मोबाईलवर नेहा ठाकूर या महिलेचा मॅसेज आला होता. तिने ती फोकस मॅनेजमेंट कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत कामाला असून कंपनीत लिडर म्हणून काम करते. त्यांच्या कंपनीच्या क्लाईंटचा व्यवसाय वाढीसाठी त्यांच्या गुगलच्या हॉटेलला रिव्ह्यू आणि कमेंट देण्याचा पार्टटाईम आहे. प्रत्येक रिव्ह्यूमागे तिला 40 रुपये मिळतील. जास्तीत जास्त रिव्ह्यू दिल्यास दिला दिवसाला तीन हजार रुपये मिळतील असे आमिष दाखविले होते. तिने होकार दिल्यानंतर तिने तिला काही लिंक पाठविले होते. त्यामुळे तिने ती लिंक ओपन केली होती. त्यानंतर तिचा मोबाईल एका व्हॉटअप ग्रुपमध्ये अॅड करण्यात आला. त्यानंतर तिच्या नावाने कंपनीत एक बोगस बँक खाते उघडण्यात आले होते.
नेहाच्या सांगण्यावरुन तिने कंपनीच्या हॉटेलला रिव्ह्यू आणि कमेंट देऊन त्याचे स्क्रिनशॉट पाठविले होते. त्यानंतर तिच्या बँक खात्यात कमिशनची रक्कम ट्रान्स्फर झाली होती. सुरुवातीला फ्री टास्क दिल्यानंतर तिला प्रिपेड टास्क देण्यात आले. या टास्कसाठी तिला काही रक्कम आधी भरावी लागणार होती, टास्क पूर्ण केल्यानंतर आधीपेक्षा जास्त कमिशन मिळणार होते. या कमिशनच्या आमिषाला बळी पडून तिने आधी रक्कम भरुन तिचे काही टास्क पूर्ण केले होते. या टास्कनंतर तिला जास्त कमिशन मिळाले होते. ही रक्कम तिच्या बँक खात्यात जमा झाल्याने तिला तिच्यावर विश्वास बसला होता.
20 ऑक्टोंबर ते 23 ऑक्टोंबर 2025 या कालावधीत तिने वेगवेगळ्या टास्कसाठी 12 लाख 14 हजार रुपयांची गुंतवणुक केली होती. मात्र तिला टास्क पूर्ण करुनही तिची मूळ रक्कमसह कमिशनची रक्कम मिळाली नाही. तिने तिच्या बँक खात्यातून पैसे काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात तिला यश आले नाही. याबाबत तिने नेहासह तिच्या दोन्ही वरिष्ठ अधिकार्यांना संपर्क साधून याबाबत तक्रार केली होती. मात्र त्यांच्याकडून तिला प्रतिसाद मिळाला नाही. तिचे बँक खाते फ्रिज झाल्याचे सांगून त्यांनी तिला काही रक्कम जमा करण्याचा सल्ला दिला, मात्र तिने पैसे जमा करण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी तिच्याशी संपर्क साधणे बंद केले होते.
पार्टटाईम जाँब देण्याचा बहाण्याने या तिघांनी तिची आर्थिक फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येतच तिने मध्य प्रादेशिक सायबर सेल पोलिसांना घडलेला प्रकार सांगून नेहासह इतर दोघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या तिघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून तिने गुंतवणुक केलेली रक्कम कुठल्या बँक खात्यात जमा झाली आहे, त्या बँक खात्याची माहिती काढली जात असल्याचे पोलिसाकडून सांगण्यात आले.