ओलीस ठेवलेल्या अल्पवयीन मुलांसह 19 जणांची सुखरुप सुटका

पोलिसांशी उडालेल्या चकमकीत 50 वर्षांच्या आरोपीचा मृत्यू

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
30 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – पवईतील आरए स्टुडिओमध्ये वेबसिरीजच्या ऑडिशनसाठी बोलाविण्यात आलेल्या बारा ते पंधरा वयोगटातील अल्पवयीन मुलांसह दोन वयोवृद्धांना ओलीस ठेवून आपली मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने हाणून पाडला. आरोपीविरुद्ध उघडलेल्या विशेष मोहीमेतंर्गत पोलिसाीं ओलीस ठेवलेल्या अल्पवयीन मुलांससह एकोणीसजणांची सुटका करुन या मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. दरम्यान पोलिसांनी उडालेल्या चकमकीत रोहित आर्या या 50 वर्षांच्या आरोपीचा मृत्यू झाला. शासकीय कामाचे दोन कोटीचे पेमेंट न मिळाल्याने, सतत उपोषण करुनही शासनाकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने त्याने सरकारला मॅसेज देण्यासाठी या मुलांना ओलीस ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते. दुसरीकडे या घटनेने पवई परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते.

रोहित आर्या हा मूळचा पुण्याचा रहिवाशी आहे. सध्या तो त्याच्या कुटुंबियांसोबत चेंबूर परिसरात राहत होता. त्याला एका वेबसिरीज निर्मिती करायची होती. त्यासाठी त्याने काही लहान मुलांना ऑडिशनसाठी बोलाविले होते. वेबसिरीज मुलांना काम मिळत असल्याचे त्यांचे पालक त्यांचया मुलांना घेऊन सकाळी अंधेरीतील पवई, साकिविहार रोडवरील महावीर क्लासिक इमारतीच बटरफ्लाय स्कूलमधील आरए स्टुडिओमध्ये आले होते. दुपारपर्यंत तिथे ऑडिशनचे काम सुरु होते. दुपारी अचानक रोहितने सतरा अल्पवयीन मुलासह दोन वयोवृद्धांना रोहित आर्याने ओलीस ठेवले होते. हा प्रकार बाहेर असलेल्या पालकांना समजताच त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. ही माहिती मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला प्राप्त होताच पवई, साकिनाका पोलीस, जलद कृती दल, बॉम्बशोधक नाशक पथक, अग्निशमन दलासह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

रोहितसोबत पोलिसांनी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो चर्चेसाठी समोर येत नव्हता. त्यामुळे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर आले होते. अग्निशमन दलाच्या मदतीने पोलिसांच्या एका विशेष पथकाने बाथरुममध्ये आत प्रवेश करुन रोहितला चौकशीसाठी ताब्यात घेतले. यावेळी ओलीस ठेवलेल्या सतरा मुलांसह दोन्ही वयोवृद्धांची पोलिसांनी सुखरुप सुटका केली. या सर्वांना स्टुडिओबाहेर काढल्यानंतर सर्व मुलांच्या त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले होते. जवळपास दोन ते तीन तास पोलिसांनी रोहितशी संभाषण करुन ओलीस ठेवलेल्या मुलांसह इतर वयोवृद्धांना सोडण्याची विनंती केली होती. मात्र त्याने पोलिसांच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले होते.

या कारवाईदरम्यान रोहितने त्याच्याकडील एअर गनने पोलिसांच्या दिशेने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांना स्वरक्षणार्थ त्याच्यावर गोळीबार करावा लागला होता. त्यात एक गोळी त्याच्या छातीत लागली होती. जखमी झालेल्या रोहितला तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सायंकाळी सव्वापाच वाजता त्याला डॉ. एम. एस बांगर यांनी तपासून मृत घोषित केले. त्याचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. रोहितच्या मृत्यूची माहिती त्याच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे. रोहितशी वारंवार संपर्क साधूनही तो बाहेर येत नव्हता. त्यामुळे विशेष पथकातील अधिकारी आणि कर्मचारी अ‍ॅक्शन मोडवर आले. यातील एका पथकाने बाथरुममधून प्रवेश करुन रोहितला ताब्यात घेतले असे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले.

ही एक आव्हानात्मक कारवाई केली. वाटाघाटीदरम्यान रोहितकडून लहान मुलांसह वयोवृद्धांना कुठलीही इजा होऊ नये म्हणून पोलिसांचे प्रयत्न होते. मात्र त्याच्याकडून कोणताही सकात्मक निकाल लागला नाही. त्यामुळे ओलीस ठेवलेल्यांना सुखरुप बाहेर काढणे हेच पोलिसांपुढे टार्गेट होते. त्यासाठी या पथकाने आपल्या जिवाची पर्वा न करता कारवाई करुन रोहितला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता असेही दत्ता नलावडे यांनी सांगितले. प्राथमिक तपासात रोहित हा मानसिक दृष्ट्या आजारी असल्याचे दिसून येत होते.
रोहितचा सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल
रोहित आणि पोलिसांमध्ये चर्चा सुरु होण्यापूर्वीच रोहितने सोशल मिडीयावर त्याचा एक व्हिडीओ व्हायरल केला होता. त्यात त्याने स्वतची ओळख रोहित आर्या असल्याचे सांगून आपण आत्महत्या करणार होता, मात्र आपण एक योजनेतंतर्गत या सर्व मुलांना ओलीस ठेवले आहे. मी दशहतवादी नाही. माझ्या फार काही मागण्या नाही. माझी खूप नैतिक मागणी तसेच काही प्रश्न आहेत. मला त्या व्यक्तींशी बोलायचे आहे, त्यांच्या प्रयत्नांना उत्तर द्यायचे आहे, तसेच त्यांच्याकडून माझ्या प्रश्नांची उत्तरे अपेक्षित आहेत. माझ्या प्रश्नांचे समाधान होईल असे उत्तर अपेक्षित आहे. दुसरे माझी काहीही अपेक्षा नाही. या घटनेनंतर मी जिवंत राहणार की नाही मला माहित नाही. पण माझा मृत्यू झाला तरी दुसरे कोणीही ते नक्कीच करेल. या मुलांना इजा व्हावी अशी आपली इच्छा नाही असेही त्याने व्हिडीओमध्ये म्हटले आहे. रोहित हा काही दिवसांपासून एका वेबसिरीजच्या कामात व्यस्त होता. त्यासाठी त्याने काही मुलांचे ऑडिशन घेतले होते तर काही मुलांना गुरुवारी आरए स्टुडिओमध्ये बोलाविण्यात आले होते. मात्र ऑडिशनदरम्यान त्याने हॉल आणि गेट बंद करुन सर्व मुलांना ओलीस ठेवले होते. एकीकडे एक पथक रोहितशी चर्चा करत होते तर दुसरीकडे दुसरे पथक ओलीस ठेवलेल्या मुलांसह वयोवृद्धांना सुखरुप कसे बाहेर काढता येईल यासाठी प्रयत्न करत होते. अखेर या पथकाला सर्व ओलीस मुलांसह वयोवृद्धांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. रोहित याचे मानसिक संतुलन चांगले होते का, या घटनेमागे त्याचा नक्की काय उद्देश होता. त्याच्याकडे सापडलेले गन, त्याचा मोबाईल आणि इतर रासायिक साहित्य फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले. त्याच्यासह सर्व मुलांसह वयोवृद्धांची कायदेशीर आणि मानसिक मूल्यांन केले जाणार आहे.
रोहितचा सुनियोजित कट असल्याचा पोलिसांचा संशय
गुरुवारी पोलिसांशी झालेल्या चकमकीत ओलीस ठेवलेल्या रोहित आर्या याचा अखेर मृत्यू झाला. रोहितने मुलांना ओलीस ठेवून त्याच्या मागण्या मान्य करण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी त्याने आधीच काही योजना बनविल्या होत्या का, त्याचा सुनियोजित कट असल्याचा पोलिसांचा संशय आहे. या संपूर्ण कटाचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. ऑडिशनसाठी रोहितने राज्यभरात काही मुलांना बोलाविले होते. त्यात मुंबईसह नवी मुंबई, कोल्हापूर, सातारा, सांगली आदींचा मुलांचा समाचवेश आहे. गुरुवारी ऑडिशनचा अंतिम टप्पा असेल असे त्यांच्या पालकांना सांगण्यात आले होते. ऑडिशनसााठी जास्तीत जास्त मुलांचा सहभाग असावा यासाठी त्याने कुठे जाहिरात केली होती का, त्यांनी सुरुवातीला काही मुलांना आणि नंतर दोन वयोवृद्धांना ओलीस ठेवले होते. त्यांच्या पालकांनाही ओलीस ठेवण्याचा त्याचा कट होता का याचा आता पोलीस तपास करत आहेत. रोहितची समजूत काढण्यासाठी एका तरुणीच्या पालकांना पोलिसांनी तिथे बोलावून घेतले होते. मात्र या पालकांचेही रोहितने काहीही ऐकले नाही. जवळपास दोन ते अडीच तास पोलिसांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो कोणाचेही काहीही ऐकण्याच्या मनस्थित नव्हता असे एकंदरीत पोलिसांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी घटनास्थळावरुन पोलिसांना पुढील कारवाईचे आदेश दिले होते. पहिल्या मजल्यावर काही मुलांना ओलीस ठेवल्यानंतर काही मुले प्रचंड घाबरले होते. एक मुलगा रडत असल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने पाहिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
दोन कोटीचा थकविल्याने ओलीस नाट्य घडले
रोहित आर्याने राज्य शासनाने त्याचे दोन कोटी थकविल्याचा आरोप केला होता. दिपक केसरकर शिक्षणमंत्री असताना त्याला स्वच्छता मॉनेटरचे एक टेंडर देण्यात आले होते. या कामाचे त्याला राज्य शासनाकडून पेमेंट देण्यात आले नव्हते. गेल्या एक वर्षांपासून त्याचे पेमेंट मिळावे यासाठी त्याचे प्रयत्न सुरु होते. त्यासाठी त्याने आंदोलन आणि उपोषण केले होते. मात्र त्याच्या उपोषणासह आंदोलनाची कुठलीही दखल घेण्यात आली नाही. त्याला केवळ आश्वासन देण्यात येत होते. त्यामुळे मानसिक नैराश्यातून त्याने ओलीस नाट्य केल्याचे बोलले जाते. मात्र या वृत्ताला पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. चौकशीनंतर या घटनेमागील सत्य बाहेर येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. रोहित आर्याला अशा प्रकारे कुठले पेमेेंट मिळणे बाकी होते का, त्याच्या कामाचे सर्वेक्षण करुन त्याच्या दाव्याची पडताळणी केली जाणार आहे. या घटनेमागील अन्य काही कारण आहे का याचीही चौकशी सुरु आहे. त्यासाठी त्याच्या कुटुंबियांची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. रोहित अशा प्रकारे काही कृत्य करणार होता, याबाबत त्याने कोणाला कल्पना दिली होती का याचा तपास सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या संपूर्ण घटनेची पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी गंभीर दखल घेत या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुन्हा दाखल होताच त्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला जाणार असल्याचे बोलले जाते.
पोलिसांकडून विशेष खबरदारी
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह अग्निशमन दलाने खबरदारीचा उपाय म्हणून पीआरटी किट, वेबर रेस्क्यू टूल्स तयार ठेवली होती. एमएफबीद्वारे एक लहान नळीची लाईन चार्ज ठेवण्यात आली होती. पहिल्या मजल्याची शिडी पहिल्या मजलाच्या खिडकीतून टाकून पोलिसांना बाथरुमद्वारे आत प्रवेश मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. सतरा अल्पवयीन मुलांसह दोन वयोवृद्धांना ओलीस ठेवण्यापूर्वी रोहितने सदरचे कृत्य करण्यासाठी चित्रपटाप्रमाणे एक सिन केल्याचे बोलले जाते. त्यासाठी त्याने ऑडिशनसाठी मुलांना बोलाविण्यासाठी एका प्रोडेक्शन टिमला हायर केले होते. त्यासाठी या टिमकडून स्टुडिओजवळ पोस्टर लावण्यात आले होते. सर्व मुले आत आल्यानंतर हॉल आणि गेट बंद करण्यात आला होता. मुलांना वेबसिरीजमध्ये काम मिळत असल्याने अनेक पालकांनी ऑडिशनसाठी त्यांच्या मुलांना पाठविले होते, इतकेच नव्हे तर ते स्वतला ऑडिशनच्या ठिकाणी आले होते. सुरुवातीला तीन दिवसांत ऑडिशनचे काम पूर्ण होईल असे वाटत असताना रोहितने आणखीन तीन दिवसांची मुदत मागून घेतली होती.
सोशल मिडीयावर सक्रिय असल्याचे उघड
रोहित हा सोशल मिडीयावर सक्रिय होता. त्याने त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड केले होते. तो मूळचा पुण्याचा रहिवाशी होता. सध्या तो त्याच्या कुटुंबियांसोबत चेंबूर परिसरात राहतो. शाळेत असताना त्याने एक उपक्रम हाती घेतला होता. त्याचे एक डिझाईन तयार केले होते. त्याचे सोशन मिडीयावर काही अकाऊंट आहे. त्याने कचर्‍याबाबत निष्काळजीपणा मुक्त महाराष्ट्र असे इंटाग्रामवर एक पेज सुरु केले होते. स्वच्छता मॉनिटर नावाने त्याने सिंधुदुर्ग येथील एका शाळेतील मुलांचा व्हिडीओ तयार करुन तो व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड केला होता. त्याचे स्वच्छताबाबत काही व्हिडीओ त्याच्या सोशल मिडीया अकाऊंटवर आहेत.
गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात
रोहितकडे पोलिसांना एक एअर गन आणि काही घातक केमिकल सापडे आहे. त्याने घातक केमिकलने संपूर्ण स्टुडिओला आग लावण्याची धमकी दिली होती. त्यामुळे त्याला ते एअर गन आणि घातक केमिकल कोणी दिले. ऑडिशनसाठी त्याने स्टुडिओ कधी, किती दिवसांसाठी बुक केला होता, हा स्टुडिओ कोणी बुक केला होता. स्टुडिओमध्ये कोणते ऑडिशन होत. मुलांना भीती वाटू नये म्हणून रोहितने त्यांना पिझ्झा आणि कोल्ड्रींग मागविले होते. ते त्यांनी कोठून मागविले होते याचा पोलिसाकडून तपास सुरु आहे. ओलीस नाट्य संपल्यानंतर फॉरेन्सिक टिमने संपूर्ण परिसराचा ताबा घेतला होता. घटनास्थळाहून काही वस्तू ताब्यात घेण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page