हेव्ही डिपॉझिटच्या तीस लाखांच्या अपहारप्रकरणी फ्लॅटमालकाला अटक
गृहकर्जाचे हप्ते न भरल्याने फ्लॅटवर बँकेकडून जप्तीची कारवाई
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
30 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – हेव्ही डिपॉझिटच्या सुमारे तीस लाखांचा अपहार करुन एका वकिलाची फसवणुक केल्याप्रकरणी हेमंत रघुनाथ माळी या फ्लॅटमालकाला एमएचबी पोलिसांनी अटक केली. भाडेतत्त्वावर दिलेल्या फ्लॅटवर गृहकर्ज असताना ही माहिती भाडेकरु वकिलांपासून लपवून ठेवून गृहकर्जाचे नियमित हप्ते न भरल्यानंतर बँकेने फ्लॅटवर कारवाई केल्यामुळे भाडेकरुला फ्लॅट रिकामे करावे लागले होते, वारंवार पैशांची मागणी करुनही फ्लॅट मालकाने हेव्ही डिपॉझिटची रक्कम परत न करता या पैशांचा अपहार केल्याचा आरोप आहे.
प्रमोद गोविंद कन्नन हे व्यवसायाने वकिल असून सध्या गोरेगाव परिसरात राहतात. चार वर्षांपूर्वी त्यांना भाड्याने एका फ्लॅटची गरज होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या परिचित ब्रोकर कुणाल पटेलकडे गेले होते. यावेळी त्याने हेमंत माळी याची दहिसर येथील एल. एम रोड, नवागाव, परिनी अॅडने इमारतीमधील तिसर्या मजल्यावर 301 क्रमांकाचा फ्लॅट असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्यांनी हेमंतची भेट घेऊन त्याला त्याच्या फ्लॅट भाड्याने देण्याबाबत चर्चा केली होती. यावेळी त्याने त्याचा थ्री बीएचके फ्लॅट असून त्याने तो फ्लॅट रामदेव नायरकडून खरेदी केल्याचे सांगितले. चर्चेअंती त्यांच्यात वीस लाखांच्या हेव्ही डिपॉझिटवर फ्लॅट देण्याबाबत ठरले होते.
ठरल्याप्रमाणे प्रमोद कन्नन यांनी त्याला वीस लाख रुपये देऊन सब रजिस्ट्रार कार्यालयात रिफंडेबल डिपॉझिटवर फ्लॅट घेत असल्याचा एक कराराची नोंदणी केली होती. याच फ्लॅटमध्ये ते त्यांच्या कुटुंबियांसासोबत शिफ्ट झाले होते. एक वर्षांनंतर त्याने त्यांच्याकडे आणखीन दहा लाखांची मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी पुढील दोन वर्षांसाठी त्याच्यासोबत तीस लाखांचा हेव्ही डिपॉझिटचा करार केला होता. या कराराची त्यांनी कायदेशीर नोंदणी केली होती. डिसेंबर 2022 ते सप्टेंबर 2024 या कालावधीसाठी हा करार झाला होता. ऑगस्ट 2023 रोजी त्यांच्या घरी स्टेट बँकेचे काही अधिकारी आले होते. यावेळी त्यांनी संबंधित फ्लॅटवर गृहकर्ज घेण्यात आले असून फ्लॅटमालकाने कर्ज घेताना फ्लॅट बँकेत तारण म्हणून ठेवला होता.
मात्र गेल्या काही महिन्यांपासून फ्लॅटमालकाने गृहकर्जाचे हप्ते भरले नाही. त्यामुळे गृहकर्जासह व्याजाची रक्कम मिळून सव्वादोन कोटीची थकबाकी आहे. या माहितीनंतर त्यांनी हेमंतला संपर्क साधून याबाबत विचारणा केली होती. यावेळी त्याने बँक अधिकार्यांशी बोलून संबंधित प्रकरण मिटविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांनी त्याला फ्लॅट खाली करतो असे सांगून त्यांच्या तीस लाखांची मागणी सुरु केली होती. मात्र त्याने त्यांना तीस लाख रुपये परत केले. वारंवार विचारणा करुनही तो पैसे देण्याचे आश्वासन देत होता. याच दरम्यान जून 2025 रोजी बँकेने संबंधित फ्लॅट सील करुन ताबा घेतला होता. त्यामुळे त्यांना फ्लॅट खाली करावा लागला होता.
याबाबत वारंवार सांगूनही हेमंत माळीने काहीच हालचाल केली नाही किंवा त्यांचे हेव्ही डिपॉझिट म्हणून घेतलेली रक्कम त्यांना परत केली नाही. या पैशांचा अपहार करुन त्याने त्यांची फसवणुक केली होती. गृहकर्ज घेताना फ्लॅट बँकेत तारण ठेवून गृहकर्जाचे हप्ते न भरल्यामुळे त्याच्या फ्लॅटवर कारवाई करण्यात आली होती. याबाबत कुठलीही माहिती न देता त्याने त्यांच्या हेव्ही डिपॉझिटचा अपहार केला होता. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी हेमंत माळीविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच हेमंतचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना चार महिन्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.