शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून चांगला परताव्याच्या आमिषाने गंडा
52 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी सायबर ठगाला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
30 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून चांगला परताव्याचे गाजर दाखवून एका सेवानिवृत्त वयोवृद्ध बँक अधिकार्याची सुमारे 52 लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी वॉण्टेड सायबर ठगाला उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. विक्रमसिंह अमरसिंह घाटगे असे या आरोपी ठगाचे नाव असून तो काही सायबर ठगांच्या संपर्कात होता. त्यांच्यासाठी त्याने बँकेत खाती उघडले होते, या बँक खात्यात फसवणुकीची रक्कम जमा होत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
63 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार गणेश रामकृष्ण लोणकर हे त्यांची पत्नी शर्मिला हिच्यासोबत गोरेगाव येथे राहतात. एका बँकेतून ते निवृत्त झाले तर त्यांची पत्नी एका नामांकित हॉस्पिटलमध्ये कामाला आहे. जून 2025 रोजी ते त्यांच्या घरी सोशल मिडीयावरील काही मॅसेज पाहत होते. याच दरम्यान त्यांचा मोबाईल क्रमांक एका खाजगी कंपनीच्या व्हॉटअप ग्रुपमध्ये अॅड करण्यात आला होता. या ग्रुपमध्ये शेअर ट्रेडिंगबाबत माहिती शेअर केली जात हाती. सुरुवातीला त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. काही दिवसांनी त्यांना सुमन गुप्ता नावाच्या एका महिलेने संपर्क साधून त्यांना शेअर ट्रेडिंगची माहिती देताना त्यांना शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला परताव्याचे आमिष दाखविण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी तिला होकार दर्शविला होता. यावेळी तिने त्यांना अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. ते अॅप ओपन करुन त्यांनी त्यांची वैयक्तिक माहितीसह बँक खात्याची तपशील अपलोड केला होता.
26 जून ते ऑगस्ट 2025 या कालावधीत त्यांनी कंपनीच्या माध्यमातून वेगवेगळ्या शेअरमध्ये 30 लाख 65 हजार 450 रुपयांची गुंतवणुक केली होती. अशाच प्रकारे त्यांना अन्य एका खाजगी कंपनीच्या व्हॉटअप ग्रुपमध्ये जोडण्यात आले होते. तिथेही त्यांना चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. या आमिषाला बळी पडून त्यांनी संबंधित कंपनीच्या माध्यमातून जुलै ते ऑगस्ट 2025 या कालावधीत 21 लाख 25 हजाराची गुंतवणुक केली होती. अशा प्रकारे त्यांनी वेगवेगळ्या शेअरमध्ये दोन कंपन्यांच्या माध्यमातून 51 लाख 90 हजार 450 रुपयांची गुंतवणुक केली होती.
या गुंतवणुकीनंतर त्यांच्या एका बँक खात्यात मूळ रक्कमेसह व्याजाची 1 कोटी 46 हजार 645 व दुसर्या बँक खात्यात 1 कोटी 23 हजार 38 हजार 232 रुपये जमा झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे त्यांनी त्यातील काही रक्कम त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात ट्रान्स्फर करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र वारंवार प्रयत्न करुनही त्यांना ही रक्कम ट्रान्स्फर करता आली नाही. त्यांनी दोन्ही कंपनीच्या प्रतिनिधींना हा प्रकार सांगितला, मात्र ते त्यांना वेगवेगळे कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते. शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने या दोन्ही कंपन्यांनी त्यांची 51 लाख 90 हजाराची फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी उत्तर सायबर सेलसह सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून संबंधित सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अज्ञात सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक माहितीवरुन विक्रमसिंह घाटगे याला ताब्यात घेतले होते. विक्रमसिंह हा मूळचा सातार्याचा रहिवाशी असून त्याच्या बँक खात्यात फसवणुकीची काही रक्कम ट्रान्स्फर झाली होती. ही रक्कम त्याने एटीएममधून काढून सायबर ठगांना दिले होते. त्यासाठी त्याला ठराविक रक्कमेचे कमिशन देण्यात आले होते. त्याने फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक खात्याची माहिती पुरविल्याचे उघडकीस आले होते. तपासात ही बाब उघडकीस येताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.