मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
८ एप्रिल २०२४
मुंबई, – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आयोजित करण्यात आलेल्या नाकाबंदीदम्यान एका एटीएम कॅश व्हॅनमधून पवई पोलिसांनी ४ कोटी ८५ लाख रुपयांची कॅश सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. ही कॅश आयकर विभागाकडे सोपविण्यात आली आहे. व्हॅनचालकाची आयकर विभागाकडून चौकशी सुरु असून या चौकशीनंतर कॅशबाबत अधिकृत खुलासा होईल असे सांगण्यात आले.
देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. या निवडणुकीदरम्यान शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये. मतदारांना आकर्षित करण्यासाठी कुठल्याही उमेदवाराकडून पैशांचा वाटप होणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. निवडणुक काळात पैशांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असल्याने अशा घटना टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. त्याचाच एक भाग म्हणून सर्वच पोलीस ठाण्यात रात्रीच्या वेळेस जास्तीत जास्त गस्त आणि नाकाबंदी करण्याचे आदेश देण्यात आले होते. मंगळवारी रात्री पवईतील पवई गार्डनजवळ स्थानिक पोलिसांनी नाकाबंदी सुरु केली होती. रात्री उशिरा तिथे खाजगी कंपनीची एक कॅश व्हॅन आली होती. या व्हॅनला थांबवून चालकाकडे क्यूआरची मागणी केली असता त्याने क्यूआर कोड दाखविला. त्याला गोरेगाव आणि अंधेरी असा क्यूआर देण्यात आला होता. मात्र त्याने दाखविलेला क्यूआर कोड वेगळा होता. त्यानंतर व्हॅनची तपासणी केल्यानंतर त्यात या अधिकार्यांना ४ कोटी ८५ लाख रुपयांची कॅश सापडली. त्याच्याकडे कॅशबाबतच्या कागदपत्रांची मागणी केल्यानंतर त्याला कागदपत्रे दाखविता आले नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच ही माहिती पोलिसांकडून आयकर विभागाला कळविण्यात आली होती. चालकाला ताब्यात घेऊन नंतर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. ही कॅश नंतर आयकर विभागाकडे सोपविण्यात आली असून त्यांच्याकडून चालकाची चौकशी सुरु आहे. त्याचा तपास आयकर विभागाकडून सुरु असून ते लवकरच त्यांचा अहवाल पोलिसांना सादर करणार आहेत.