मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२४ मे २०२४
मुंबई, – पवईतील एका वयोवृद्ध महिलेच्या घरी चोरी केल्याप्रकरणी दिपाली सुमुख दफ्तरे या नर्स महिलेला पवई पोलिसांनी अटक केली. कर्जबाजारी झाल्याने तिने तीन लाखांची कॅश चोरी केल्याची कबुली दिली आहे. अटकेनंतर तिला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
निना तोलाराम जलान ही ७५ वर्षांची वयोवृद्ध महिला पवईतील हिरानंदानी परिसरात राहते. तिच्याकडे दोन नोकर आणि एक नर्स कामाला आहे. तिच्याकडे पूर्वी दिपाली ही नर्स म्हणून काम करत होती. अडीच वर्ष काम केल्यानंतर तिने तिला कामावरुन काढून टाकले होते. दिपालीवर तिचा प्रचंड विश्वास होता. त्यामुळे ती तिच्या घरी कुटुंबातील एका सदस्याप्रमाणे राहत होती. घरातील कामासोबत तिच्याकडे बहुतांश हिशोब तिने सोपविला होता. गेल्या वर्षी निना यांना न्यूमोनिया झाला होता, त्यामुळे तिला हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. यावेळी दिपालीसह अन्य एक महिला तिच्याकडे नर्स म्हणून काम करत होत्या. जानेवारी २०२४ रोजी तिने टॅक्स भरण्यासाठी, औषधांसह घरखर्चासाठी तीन विविध पाकिटात अडीच लाख आणि एक लाख रुपये ठेवले होते. दिपाली ही औषधांसह घरखर्चासाठी अनेकदा कपाटातून पैसे काढत होती. तिच्याशिवाय तिच्या कपाटात कोणीही हात लावत नव्हते. काही दिवसांपूर्वी तिला पाकिटातून तीन लाख रुपयांची कॅश चोरीस गेल्याचे दिसून आले. ही चोरी तिच्याकडे काम करणारी दुसरी नर्स करत असल्याचा संशय व्यक्त करुन तिने तिच्याविरुद्ध पवई पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी या नर्सला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत तिचा या चोरीमागे सहभाग उघडकीस आला नाही.
याच दरम्यान निना यांना दिपालीने काही सोन्याचे दागिने खरेदी केले आहे. घराची डागडुजी केली आहे, मोठ्या प्रमाणात महागडी शॉपिंग केले आहे. त्यामुळे तिनेच घरातील तीन लाखांची कॅश चोरी केल्याचा संशय व्यक्त करुन तिने पुन्हा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करुन दिपालीला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत तिने डिसेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत तीन लाखांची ही कॅश चोरी केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर तिला पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यांत अटक केली. अटकेनंतर तिला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. कर्जबाजारी झाल्याने तिने ही चोरी केल्याची कबुली दिली.