मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२५ जून २०२४
मुंबई, – मसाजच्या नावाने स्पामध्ये चालणार्या एका सेक्स रॅकेटचा पवई पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी निखिल मनहरलाल पारेख या मॅनेजरला पोलिसांनी अटक केली तर दोन महिलांची सुटका केली. या दोन्ही महिलांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले. निखिलविरुद्ध भादवीसह पिटा कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
पवईतील चांदीवली रामबाग, मेट्रो रेसीडेन्सी हॉटेलजवळील क्रिस्टा कोर्ट इमारतीमध्ये अरुजा (मोक्ष) नावाचे एक स्पा आहे. या स्पामध्ये मसाजच्या नावाने काही महिलांच्या मदतीने सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती पवई पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांच्या पथकाने तिथे बोगस ग्राहक पाठवून त्याची शहानिशा करण्याची योजना बनविली होती. ठरल्याप्रमाणे रविवारी २३ जूनला दुपारी पावणेचार वाजता तिथे एक बोगस ग्राहक पाठविण्यात आला होता. यावेळी त्याने स्पाचा मॅनेजर निखिल पारेख याच्याकडे शारीरिक संबंधासाठी महिलेची मागणी केली होती. यावेळी त्याने त्याच्याकडे एका महिलेमागे पाच हजार रुपयांच्या मोबदला द्यावा लागेल असे सांगितले. त्याने होकार दिल्यानंतर त्याने त्याला स्पामध्ये दोन महिलांची ओळख करुन दिली. त्यापैकी बोगस ग्राहकाने एका महिलेची निवड करुन पोलिसांना मिस कॉल करुन बातमीत तथ्य असल्याचा इशारा दिला होता. मिस कॉल प्राप्त होताच या पथकाने तिथे छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांनी निखील पारेख याला ताब्यात घेतले. घटनास्थळी असलेल्या दोन महिलांची पोलिसांची सुटका केली.
त्यांच्या चौकशीत निखील हाच स्पाचा मालक आणि चालक असल्याचे सांगितले. मसाजमध्ये कमी मोबदला मिळत असल्याने तो त्यांना ग्राहकांसोबत शारीरिक संबंधासाठी पाठवत होता. त्यासाठी त्याला पाच हजार रुपये मिळत होते. त्यातील काही रक्कम संबंधित महिलांना देऊन तो उर्वरित रक्कम स्वतचा कमिशन म्हणून ठेवत होता. हा प्रकार उघडकीस येताच पवई पोलिसांनी निखिल पारेखविरुद्ध भादवीसह पिटा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी चार मोबाईल, पाच हजाराची कॅश आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेनंतर त्याला सोमवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन्ही महिलांना नंतर मेडीकलसाठी पाठविण्यात आले होते. मेडीकलनंतर त्यांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले होते.