मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२ मे २०२४
मुंबई, – लोकलने प्रवास करताना माटुंगा-सायन रेल्वे स्थानकादरम्यान हातावर फटका मारुन मोबाईल चोरी करुन पळून जाणार्या चोरट्याचा पाठलाग करताना तीन ते चारजणांच्या एका टोळीने विषारी इंजेक्शन मारल्याने प्रकृती खालावलेल्या विशाल पाटील या पोलीस शिपायाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी दादर रेल्वे पोलिसांनी भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या घटनेने पोलीस दलात प्रचंड शोककळा पसरली आहे. दरम्यान या घटनेची रेल्वे पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकसेाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
ठाणे येथे राहणारा विशाल पाटील हे मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होते. सध्या त्यांची नियुक्ती एल तीनमध्ये होती. गेल्या आठवड्यात दिवसपाळीची ड्यूटी संपवून ते रात्रीच्या वेळेस ठाण्यातील घरी जाण्यासाठी निघाले होते. प्रवासदरम्यान लोकलच्या दरवाज्याजवळ विशाल हे मोबाईलवर बोलत होते. ही लोकल माटुंगा-सायन रेल्वे स्थानकादरम्यान स्लो झाली होती. त्याचाच फायदा घेऊन एका अज्ञात चोरट्याने त्यांच्या हातावर जोरात फटका मारला. त्यामुळे त्यांचा मोबाईल खाली पडला. लोकल स्लो असल्याने त्यांनी चालत्या लोकलमधून उडी घेऊन मोबाईल चोरी करणार्या आरोपीचा पाठलाग सुरु केला होता. रात्रीच्या अंधारात पाठलाग करुन त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिथे आलेल्या त्याच्या इतर सहकार्याने त्याच्या पाठीवर विषारी इंजेक्शन मारले. तसेच त्याच्या तोंडावर लाल रंगाचे द्रव्य ओतले होते. त्यामुळे विशाल हे बेशुद्ध झाले. जवळपास बारा तासांनी ते शुद्धीवर आले. त्यानंतर ते त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी त्यांच्या सहकार्यांना ही माहिती सांगितली. मात्र घरी आल्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे विशालला त्यांच्या मित्रांनी सोमवारी ठाण्यातील एका खाजगी हॉस्पिटमलमध्ये दाखल केले. तिथे उपचार सुरु असताना शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. हा प्रकार समजताच कोपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी पोलिसांनी ३९२, ३९४, ३२८, ३४ भादवी (संगनमताने जबरी चोरी करताना विषारी द्रव्य पाजून गंभीर दुखापत करणे) या कलमांतर्गत गुन्हा नोंद केला होता. हा गुन्हा नंतर दादर रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. या घटनेची रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दादर रेल्वे पोलिसांसह गुन्हे शाखेला दिले आहेत. त्यामुळे आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.