मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
७ एप्रिल २०२४
मुंबई, (प्रतिनिधी) – सात लाखांचे पर्सनल कर्ज घेऊन बजाज फायनान्स कंपनीची फसवणुक करुन पळून गेलेल्या एका ठगाला अखेर वनराई पोलिसांनी अटक केली. रंजन किसनचंद भाटिया असे या ठगाचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवली कोर्टात हजर करण्यात आले होते. पोलीस कोठडीनंतर तो सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. रंजन भाटियाने दुसर्याच व्यक्तीच्या शासकीय दस्तावेजाचा गैरवापर करुन कर्ज घेऊन ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
गोरेगावचा रहिवाशी असलेला ३० वर्षीय रवी युवराज मोरे हा बजाज फायानान्स कंपनीत मॅनेजर म्हणून काम करतो. या कंपनीचे एक मुख्य कार्यालय गोरेगाव येथील विरवानी इंडस्ट्रियल इस्टेट, बिझनेस पार्कमध्ये आहे. १९ मार्च २०२२ रोजी त्याच्या कंपनीत रंजन भाटिया याने वैयक्तिक कर्जासाठी अर्ज केला होता. या अर्जासोबत त्याने त्याचे पॅनकार्ड, आधारकार्ड, एका खाजगी नोकरीचे नियुक्तीपत्र, विमा पॉलिसीचे कागदपत्रे आदी दस्तावेज सादर केले होते. या दस्तावेजाची पडताळणी केल्यानंतर तो सात लाख रुपयांच्या पर्सनल लोनसाठी पात्र असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे त्याच्या बँक खात्यात कर्जाची सात लाखांची रक्कम ट्रान्स्फर करण्यात आली होती. सप्टेंबर २०२३ पर्यंत त्याने कंपनीने दिलेल्या कर्जाचे नियमित हप्ते भरले होते, नंतर कर्जाचे हप्ते भरणे बंद केल्यानंतर कंपनीचे कर्ज वसुली विभागाचे गुरुचरण सिंग यांनी त्याच्या पंजाब येथील पत्त्यावर जाऊन चौकशी केली होती. यावेळी त्याच्या आईची त्यांची भेट झाली. यावेळी तिचा मुलगा सुरींदरकुमार भाटिया हा पंजाबच्या मोहाली येथे नोकरीस असून त्याने त्यांच्या कंपनीतून कुठलेही पर्सनल कर्ज घेतले नसल्याचे सांगितले.
चौकशीदरम्यान रंजनने सुरींदर भाटिया या नावाने बोगस दस्तावेज सादर करुन कर्जासाठी अर्ज करुन ही फसवणुक केल्याचे उघडकीस आले होते. हा प्रकार उघडकीस येताच कंपनीच्या वतीने रवी मोरे यांनी पवई पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर रंजन भाटिया याच्याविरुद्ध पोलिसांनी ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच रंजन हा पळून गेला होता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना दिड महिन्यानंतर रंजनला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. चौकशीत त्याने रंजन सुरींदरकुमार भाटिया या व्यक्तीचे दस्तावेजाचा गैरवापर करुन ही फसवणुक केल्याची कबुली दिली. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली.