विनयभंगासह पोक्सोच्या वॉण्टेड आरोपीची आत्महत्या
मैत्रिणीच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप होता
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – मैत्रिणीच्या चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा झोपेत अश्लील चाळे करुन विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरिफ नावाच्या एका वॉण्टेड आरोपीने सोमवारी त्याच्या मालवणीतील राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. विनयभंगासह पोक्सोच्या गुन्ह्यांत अटकेच्या भीतीपोटी त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जाते. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे.
यातील तक्रारदार मालवणी परिसरात राहत असून त्यांना चौदा वर्षांची मुलगी आहे. आरोपी हा त्यांच्या पहिल्या पत्नीचा मित्र असून सध्या तिच्यासोबत तिच्या राहत्या घरी राहतो. ७ ऑक्टोंबरला तिच्या कोणीही नव्हते. यावेळी तिची तिची अल्पवयीन मुलगी ही घरात एकटीच झोपली होती. घरात कोणीही नसल्याची संधी साधून आरोपी तिथे आला आणि त्याने झोपेत असलेल्या मुलीच्या छातीला नकोसा स्पर्श करुन अश्लील चाळ करुन तिचा विनयभंग केला होता. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली होती. त्यामुळे सुरुवातीला तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. मात्र नंतर तिने घडलेला प्रकार तिच्या तक्रारदार पित्याला सांगितला. मुलीकडून ही माहिती समजताच त्यांनी मालवणी पोलीस ठाण्यात आरोपी मित्राविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोपी पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच सोमवारी या आरोपीने त्याच्या मालवणीतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार नंतर स्थानिक रहिवाशांकडून समजताच मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्याला जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. चौकशीत आरोपीविरुद्ध गेल्याच आठवड्यात विनयभंगासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यांत अटकेच्या भितीने त्याने आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.