मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
15 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – सिग्नल तोडल्याने ई-मशिनद्वारे दंडात्मक कारवाई करणार्या सहाय्यक फौजदारावर आरोपी चालकाने वॉकीटॉकी मारुन दुखापत करुन सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार सायन परिसरात घडली. याप्रकरणी हरकशनसिंग जसपालसिंग रत्ती याच्याविरुद्ध सायन पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. अटकेनंतर त्याला नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे. हरकशनसिंगवर वॉकीटॉकी तोडून 25 हजाराच्या शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याचा आरोप असून ही नुकसानभरपाई त्याच्याकडून वसुली केली जाणार आहे.
मिराजी पंढरी मेश्राम हे 54 वर्षांचे तक्रारदार कल्याणच्या नांदिवलीचे रहिवाशी आहे. सध्या ते माटुंगा वाहतूक विभागात सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी सायंकाळी ते सायन येथील तृप्ती हॉटेलजवळील सुलोचना शेट्टी रोड परिसरात कर्तव्य बजावत होते. सायंकाळी पावणेआठ वाजता एका बाईकस्वाराने सिग्नल तोडून बाईक पुढे नेण्याचा प्रयत्न केला होता, हा प्रकार लक्षात येताच मिराजी मेश्राम यांनी संबंधित बाईकस्वाराला थांबवून सिग्नल तोडल्याने त्याच्यावर ई-चलनद्वारे कारवाई करण्यास सुरुवात केली. त्याचा राग आल्याने त्याने त्यांच्या कारवाईला विरोध करुन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
त्यांच्या हातातील वॉकीटॉकी हिसकावून त्याने ती त्यांच्या डोक्यात मारली होती. त्यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. वॉकीटॉकीचे नुकसान झाले होते. ही माहिती प्राप्त होताच सायन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी पोलिसांनी बाईकस्वार हरकशनसिंग याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. याप्रकरणी मिराजी मेश्राम यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी त्याच्याविरुद्ध पोलिसांशी हुज्जत घालून शासकीय मालमत्तेचे नुकसान करुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला अटक करुन नोटीस देऊन सोडून देण्यात आले.
हवालदाराला लाथेने बेद मारहाण करणार्या आरोपीस अटक
दुसर्या घटनेत हमजा नवाझ शेख या आरोपीस व्ही. बी नगर पोलिसांनी अटक केली. चंद्रकांत योगेश बाबर हे कुर्ला येथील नेहरुनगर पोलीस वसाहतीत राहत असून सध्या व्ही. बी नगर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून काम करतात. मंगळवारी हमजा शेख हा बॅटरी चोरी करताना रंगेहाथ पकडलेल्या एका व्यक्तीला मारहाण करत असून पोलीस मदतीची गरज असल्याचा कॉल आला होता. त्यामुळे चंद्रकांत बाबर हे त्यांच्या सहकार्यासोबत तिथे गेले होते. मात्र तिथे गेल्यानंतर असा कुठलाही प्रकार घडला नसल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलीस परिसरातील आस्थापना बंद करत होते.
यावेळी तिथे हमजा शेख आला आणि त्याने सरकारी कामात अडथळा आणून पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने चंद्रकांत बाबर यांना जोरात लाथेने मारहाण केली. त्यात त्यांना दुखापत झाली होती. या घटनेनंतर हमजा शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होताच त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.
रस्त्यासह पोलीस ठाण्यात धिंगाणा घालणार्या महिलेस अटक
तिसर्या कारवाईत पोलिसांनीी ज्योती शंकर पवार या 40 वर्षांच्या मद्यपी महिलेला अटक केली. ज्ञानेश्वर शंकर मुंडे हे पोलीस शिपाई असून सध्या आरसीएफ पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. सोमवारी एक वाजता ते चेंबूरच्या आर. सी मार्ग, वाशीनाका ब्रिजखाली कर्तव्य बजावत होते. यावेळी ज्योती नावाच्या महिलेने दारुच्या नशेत ज्ञानेश्वर मुंडे यांच्यासह जमलेल्या लोकांना अश्लील भाषेत शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली होती. मुंडे यांच्या ताब्यातील वॉकीटॉकी बळजबरीने हिसकावून स्वतजवळ ठेवला. त्यांचे कॉलर पकडून शर्टाचे बटन, नेमप्लेट आणि लाईन यार्ड तोडून नुकसान केले.
पोलीस ठाण्यात आणल्यानंतर तिने पोलीस शिपाई चौधरी, ठाणे अंमलदार पोलीस उपनिरीक्षक सोनोने आणि उपस्थित महिला पोलीस कर्मचार्यांना शिवीगाळ करुन बघून घेण्याची धरूमकी दिली. पोलीस ठाण्याच्या संगणकाचा की बोडून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत तिच्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. या आदेशानंतर ज्ञानेश्वर मुंडे यांच्या तक्रारीवरुन ज्योती पवार हिच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तिच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.