मैदानी परिक्षेसाठी आलेल्या उमेदवाराकडे सापडले उत्तेजक द्रव्य

गोरेगावच्या एसआरपीएफमधील घटना; उमेदवाराविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ जून २०२४
मुंबई, – गोरेगाव येथील राज्य राखीव पोलीस बलाच्या (एसआरपीएफ) मैदानात मैदानी परिक्षेसाठी आलेल्या एका उमेदवाराकडे उत्तेजक द्रव्य सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. धावताना स्टॅमिना राहावा आणि पायात गोळे येऊ नये म्हणून त्याने त्याच्या बॅगेत स्टेरॉईड आणि इंजेक्शन सिरीज आणले होते, ते उत्तेजक द्रव्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी संंबंधित उमेदवाराविरुद्ध वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून चौकशीनंतर त्याच्याविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान पोलीस शिपाई होण्यापूर्वी या उमेदवाराविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने तिथे आलेल्या अन्य उमेदवारांमध्ये एकच खळबळ उडाली होती.

राज्य पोलीस दलातील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई पदाच्या जागा भरण्यासाठी गृहविभागाने पोलीस भरतीची घोषणा केली होती. राज्यात सध्या १७ हजार ४७१ पोलीस शिपायांची भरतीची प्रक्रिया सुरु आहे. त्यात ९ हजार ५९५ पोलीस शिपाई, १ हजार ६८६ पोलीस शिपाई चालक, ४ हजार ३४९ एसआरपीएफ, १ हजार ८०० कारागृह शिपाई पदांचा समावेश आहे. याच पदासाठी आतापर्यंत १७ लाख ७६ हजार २४६ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यात काही डॉक्टर, बी टेक, एमबीए पदवी घेतलेल्या उमेदवारांचा समावेश आहे. परिक्षेदरम्यान कॉपीसह डमी उमेदवार येऊ नये, चिप अदलाबदलीसारखे घटना घडू नये म्हणून पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली होती. तसेच गैरकृत्य करणार्‍याविरुद्ध सक्त कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले होते. मुंबई पोलीस दलातील पोलीस शिपाई भरतीसाठी गोरेगाव येथील राज्य राखीव पोलीस बलाच्या मैदानात मैदानी चाचणी सुरु आहे. तिथे पाच किलोमीटर धावणे, शंभर मीटर शॉटपूट अशी मैदानी परिक्षा होणार होती.

गुरुवारी परिक्षेसाठी पात्र असलेल्या ३७४ उमेदवारांना बोलाविण्यात आले होते. यावेळी प्रत्येक उमेदवारासह त्यांच्याकडील सामानाची तपासणी घेण्यात आली होती, ही तपासणी केल्यानंतर त्यांना आतमध्ये सोडले जात होते. गेटवर एसआरपीएसचा एक अधिकारी आणि इतर कर्मचारी संबंधित उमेदवारांची तपासणी करत होते. यावेळी एका उमेदवाराच्या बॅगेत त्यांना स्टेरॉईड आणि एका खाजगी कंपनीचे इंजेक्शन सिरीज सापडले होते. हा प्रकार वरिष्ठांना सांगितल्यानंतर त्यांनी संबंधित उमेदवाराविरुद्ध कारवाईचे आदेश जारी केले होते. त्यानंतर या अधिकार्‍यांना ही माहिती वनराई पोलिसांना दिली. त्यांच्या तक्रार अर्जानंतर पोलिसांनी या उमेदवाराविरुद्ध उत्तेजक द्रव्य आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्याची चौकशी केली असता त्याने धावताना स्टॅमिना राहावा आणि पायात गोळे येऊ नये म्हणून ते औषधे आणल्याची कबुली दिली आहे. तो मुंबईचा रहिवाशी असून त्याने पहिल्यांदाच पोलीस शिपाई पदासाठी अर्ज केला होता. त्याने ते औषधे कोठून घेतले, त्याला ते घेण्यास कोणी प्रवृत्त केले होते का याचा आता पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page