मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ मे २०२४
मुंबई, – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घरात काळा पैसा जमा केल्याचा आरोप करुन एका कॅफे मालकाच्या घरात घुसून सुमारे २५ लाख रुपयांची कॅश लुटल्याप्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला नागपाडा मोटार परिवहन विभागाचा पोलीस हवालदार बाबासाहेब सटवाजी भागवत याच्यावर ३११ (२) कलमांतर्गत पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. सोमवारी २० मेला या बडतर्फीचे आदेश काढण्यात आले असून आदेशाची एक प्रत बाबासाहेब भागवत याला देण्यात आली आहे.
नरेश नागेश नायक हे सायन परिसरात राहत असून ते व्यवसायाने व्यावसायिक आहे. त्यांच्या मालकीचे एक कॅफे शॉप आहे. सोमवारी १३ मेला सायंकाळी ते त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांच्या घरी सहाजण आले होते. त्यांनी ते पोलीस असल्याचे सांगून त्यांच्या घराची झडती घेण्यास सुरुवात केली होती. यावेळी त्यांनी पोलीस असल्याचे ओळखपत्र दाखविले होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी त्यांच्या घरात मोठ्या प्रमाणात काळा पैसा लपविला आहे असा आरोप ही कारवाई सुरु असल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्या ड्रॉव्हरमध्ये त्यांना २५ लाखांची कॅश सापडली होती. ही कॅश त्यांच्या कॅफे व्यवसायाशी संबंधित होती. याबाबत त्यांना सांगूनही त्यांनी त्यांच्याविरुद्ध कारवाईची धमकी देत ही कॅश ताब्यात घेतली होती. त्यांच्याविरुद्ध कारवाई न करण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे दोन कोटीची मागणी केली होती. मात्र दोन कोटी रुपये आपल्याकडे नसल्याचे सांगूनही ते सर्वजण त्यांना धमकी देत होते. त्यानंतर ते सर्वजण २५ लाखांची कॅश घेऊन तेथून निघून गेले. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी सायन पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पोलिसांनी सहाही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासांत पोलीस हवालदार बाबासाहेब भागवत यांच्यासह एका निलंबित पोलीस हवालदार आणि इतर चौघांना पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत ते सर्वजण २१ मेपर्यंत पोलीस कोठडीत होते. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. बाबासाहेब भागवत हे नागपाडा मोटार परिवहन विभागात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असून त्यांचे कृत्य अक्षम्य आहे. समाजविघातक आहे. त्यांनी पोलीस दलातील दिलेल्या कर्तव्याचा आणि शासकीय वाहनाचा गैरवापर करुन हा गुन्हा केला होता. हा गुन्हा करताना भावी परिणामांची जाणीव असूनही पूर्वनियोजित कट रचून त्यांनी हा दरोडा टाकला होता, त्यात प्रत्यक्ष भाग घेतला होता. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३११ (२) अन्वये पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. बडतर्फीची नोटीस त्यांना सोमवारी २० मेला देण्यात आली असून त्यांनी ती नोटीस स्विकारली आहे असे पोलिसांकडून सांगण्यात आले.