46 लाख 50 हजाराची लाच घेणारा लाचखोर पोलीस उपनिरीक्षक गजाआड

सुरुवातीला दोन लाखांची मागणी करुन नंतर दोन कोटी मागितले

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
2 नोव्हेंबर 2025
पुणे, – फसवणुकीच्या गुन्ह्यांत अशिलाच्या वडिलांना मदतीसोबत जामिनाला विरोध न करण्यासाठी 46 लाख 50 हजाराची लाच घेणार्‍या एका लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाला पुणे युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. प्रमोद चिंतामणी असे या 35 वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून तो सध्या पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला दोन लाखांची मागणी करणार्‍या प्रमोदने अचानक तक्रारदार वकिलाच्या फीसह आशिलाच्या वडिलांच्या एकूण प्रॉपटीचा अंदाज घेत दोन कोटीची मागणी केल्याचे उघडकीस आले आहे. या कारवाई पिंपरी-चिंचवड पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

यातील 48 वर्षांचे तक्रारदार व्यवसायाने वकिल असून त्यांच्या अशिलाविरुद्ध बावधान पोलीस ठाण्यात बोगस दस्तावेज सादर करुन पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी एका गुन्ह्यांची नोंद झाली होती. या गुन्ह्यांचा तपास नंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. त्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी यांच्याकडे होता. गुन्हा दाखल होताच अशिलाच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली होती. पोलीस कोठडीनंतर त्यांना लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. सध्या ते पुण्यातील जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत.

काही दिवसांनी तक्रारदार वकिलांनी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी यांची भेट घेऊन त्यांना अशिलाच्या वडिलांना गुन्ह्यांत मदत करणे, त्यांच्या जामिनावर विरोध न करण्यासाठी विनंती केली होती. त्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे दोन लाखांची लाचेची मागणी केली होती. ही लाच दिल्यानंतर त्यांनी त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले होते. लाचेची रक्कम देण्याची इच्छा नसल्याने 13 ऑक्टोंबरला त्यांनी प्रमोद चिंतामणी यांच्याविरुद्ध लाचेची मागणी केल्याप्रकरणी तक्रार केली होती. या तक्रारीची 27 ऑक्टोंबरला संबंधित अधिकार्‍यांकडून शहानिशा करणयात आली होती. यावेळी प्रमोद चिंतामणी यांनी त्यांच्याकडे त्यांच्या फीसह त्यांच्या अशिलाच्या बँक खात्याचा अंदाज घेत त्यांच्या वडिलांना मदत करणसाठी दोन लाखांऐवजी अचानक दोन कोटीची मागणी केली होती.

त्यापैकी एक कोटी स्वतसाठी तर एक कोटी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना देण्यात येणार असल्याचे सांगितले. लाचेचा 50 लाखांचा पहिला हप्ता घेऊन त्यांना बोलाविण्यात आले होते. त्यामुळे तक्रारदार लाचेचा पहिला हप्ता घेऊन पुण्यातील रस्ता पेठ, उंटाड्या मारुती मंदिरासमोर गेले होते. काही वेळानंतर तिथे प्रमोद चिंतामणी आले होते. यावेळी तक्रारदाराकडून लाचेचा 50 लाखांपैकी 46 लाख 50 हजार रुपयांची रक्कम घेताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

या कारवाईनंतर त्यांना समर्थ पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तिथे त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून गुन्ह्यांचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागात वर्ग करण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी दिड लाखांच्या खर्‍या नोटा, 45 लाखांच्या खेळण्यातील नोटा, सॅमसंग व अ‍ॅपल कंपनीचे दोन मोबाईल, 3600 रुपयांची कॅश, प्रमोद चिंतामणी यांचे ओळखपत्र आदी मुद्देमाल जप्त केला होता.

या कारवाईनंतर त्यांच्या पुण्यातील राहत्या घरी दुसर्‍या पथकाने कारवाई केली होती. या कारवाईचा तपशील समजू शकला नाही. प्रमोद सध्या पुण्यातील भोसरी, दिघी रोड, गंगोत्री पार्कच्या सोपान रेसीडेन्सीमध्ये राहत असून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, अविनाश घरबुडे, पोलीस शिपाई रवी दिवेकर, प्रविण तावरे, विकास आडके, सहाय्यक फौजदार चालक चव्हाण, महिला पोलीस शिपाई सुप्रिया काळे यांनी केली. गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे यांच्याकडे आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page