कस्टममध्ये जमा करण्यासाठी घेतलेल्या पैशांचा अपहार
१.४४ कोटीच्या अपहारप्रकरणी पती-पत्नीविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० डिसेंबर २०२४
मुंबई, – व्यावसायिक कामानिमित्त कस्टम विभागात जमा करण्यासाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन एका व्यक्तीची फसवणुक झाल्याचा प्रकार पायधुनी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका खाजगी कंपनीचे मालक असलेल्या पती-पत्नीविरुद्ध पायधुनी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.ं कल्पेश भवानजी लोडाया आणि स्मिता कल्पेश लोडाया अशी या दोघांची नावे असून ते दोघेही मुलुंडचे रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सनी श्यामसुंदर जैन हे जुहू येथील जेव्हीपीडी स्किम परिसरात राहत असून ते एका खाजगी कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करतात. कल्पेश हा त्यांचा व्यावसायिक मित्र असून त्याची मेस्मिताक्षी लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक खाजगी कंपनी आहे. त्याला कस्टम विभागात काही रक्कम जमा करायची होती. त्यासाठी त्याला पैशांची गरज होती. त्यामुळे त्याने सनी जैन यांना आर्थिक मदत करण्याची विनंती केली होती. कल्पेश हा त्याच्या परिचित असल्याने त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून एप्रिल ते ऑक्टोंबर २०२४ या कालावधीत १कोटी ६७ लाख रुपये दिले होते. ही रक्कम त्याच्या कंपनीच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यात आले होते. हा संपूर्ण व्यवहार मशिदबंदर येथील चॅम्पियन डिलर्स प्रायव्हेट लिमिटेड, भारत चेबर्समध्ये झाला होता.
सनी जैन यांच्याकडून घेतलेले पैसे त्याला कस्टम विभागात भरायचे होते. मात्र त्याने ती रक्कम कस्टम विभागात जमा न करता त्याची कंपनीतील पार्टनर पत्नी स्मिता आणि दोन मुलींच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती. या रक्कमेचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर करुन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी त्याच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती. सतत पैशांची मागणी होत असल्याने कल्पेश व त्याची पत्नी स्मिता यांनी त्यांना चार धनादेश दिले होते. मात्र ते चारही धनादेश बँकेत न वटता परत आले होते. पैशांची मागणी करुन त्यांच्याकडून त्यांचे पेमेंट दिले जात नव्हते. त्यामुळे त्यांनी त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली होती.
या धमकीनंतर या दोघांनी त्यांच्या बँक खात्यात २२ लाख ७५ हजार रुपये ट्रान्स्फर केले होते. तसेच त्यांच्याविरुद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई करु नये. आपण लवकरात लवकर उर्वरित पैसे देऊ असे सांगितले. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी त्यांचे १ कोटी ४४ लाख रुपये परत न करता त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी या पती-पत्नीविरुद्ध पायधुनी पोलिसांत तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर कल्पेश लोडाया आणि स्मिता लोडाया या दोघांविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई होईल असे पोलिसाकडून सांगण्यात आले.