मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
20 मे 2025
मुंबई, – विविध शासकीय कामाच्या आमिषाने अनेकांना सुमारे 24 कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी वॉण्टेड असलेल्या आयपीएस अधिकारी रश्मी करंदीकर यांचे पती पुरुषोत्तम प्रभाकर चव्हाण याला अखेर मंगळवारी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. व्हॉईट कॉलर गुन्हेगार असलेल्या पुरुषोत्तमविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेत दोन वेगवेगळ्या फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद असून त्याच्याविरुद्ध मुंबईसह गुजरात आणि ईडीमध्ये फसवणुकीसह मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांची नोंद आहे. पोलीस कोठडीत असलेल्या पुरुषोत्तमची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु असून या चौकशीतून इतर काही फसवणुकीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
पुरुषोत्तम चव्हाण व त्याचे दोन सहकारी नारायण सावंत आणि यशवंत पवार यांनी शासकीय कोट्यातील भूखंड-सदनिका, पुणे-ठाणे महानगरपालिकेचे डेव्हल्पेमेंट सर्टिफिकेटस, नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये टी-शर्ट आणि हुडी पुरविण्याचे बोगस कंत्राटाचे दस्तावेज बनवून पैशांचा अपहार करुन काही व्यावसायिकांसह इतर तक्रारदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणुक केल्याचा आरोप असून याच गुन्ह्यांत या तिघांविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेत दोन स्वतंत्र फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. याच गुन्ह्यांबाबत आयपीएस अधिकारी रश्मी करंदीकर यांचीही पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात आली होती. पुरुषोत्तम चव्हाण हा आयपीएस अधिकारी रश्मी करंदीकर यांचा पती आहे.
यापूर्वी त्याला 263 कोटीच्या टीडीएस घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या अधिकार्यांनी अटक केली होती. त्याच्याविरुद्ध अनेक व्यावसायिकांची फसवणुक केल्याचा आरोप आहे. अनेकांना या टोळीने शासकीय कोट्यातून कमी किंमतीत भूखंड तसेच सदनिका देण्याचे आश्वासन दिले होते. पुणे आणि ठाणे महानगरपालिकेच्या डेव्हल्पमेंट राईट सर्टिफिकेट तसेच नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये टी शर्ट आणि हुडी पुरविण्याचे कंत्राट मिळवून देतो असे सांगत होते. मार्च 2015 ते एप्रिल 2024 या कालावधीत त्यांच्याकडून त्यांनी आतापर्यंत 24 कोटी 78 लाख रुपये घेतले होते. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित तक्रारदार व्यावसायिकांसह इतरांनी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर जानेवारी महिन्यांत पुरुषोत्तम चव्हाणसह नारायण सावंत आणि यशवंत पवार या तिघांविरुद्ध दोन फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले होते.
या दोन्ही गुन्ह्यांचा तपास नंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत पुरुषोत्तम हा वॉण्टेड आरोपी होता. अखेर त्याला मंगळवारी फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. गेल्या महिन्यांत त्याला गुजरात पोलिसांनी अशाच एका फसवणुकीच्या गुन्ह्यांत अटक केली होती. या गुन्ह्यांत न्यायालयीन कोठडीत असलेल्या पुरुषोत्तमचा ताबा नंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता.