मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
20 मे 2025
मुंबई, – सतरा वर्षांच्या अल्पवयीन कॉलेज तरुणीवर तिच्याच कॉलेजच्या प्रिसिंपलने अश्लील चाळे करुन विनयभंग केल्याची धक्कादायक घटना बोरिवली परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच 37 वर्षांच्या आरोपी प्रिसिंपलला एमएचबी पोलिसांनी अटक केली आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सतरा वर्षांची बळीत मुलगी ही नागपाडा परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहते. सध्या ती बोरिवलीतील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत असून तिथेच आरोपी प्रिसिंपल म्हणून काम करतो. गेल्या काही दिवसांपासून तो बळीत मुलीशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. तिच्याशी अश्लील लगट करुन तिचा विनयभंग करत होता. त्याच्याशी प्रेमसंबंध ठेवावे म्हणून तो तिच्यावर सतत दबाव आणत होता. दबाव आणताना तो तिच्याशी नेहमीच अश्लील चाळे करत होता.
जून 2024 ते मे 2025 या कालावधीत अनेकदा त्याने तिच्याशी जवळीक साधून तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. सुरुवातीला बदनामीच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र आरोपी प्रिसिंपलकडून सतत होणार्या मानसिक व शारीरिक शोषणाला कंटाळून तिने एमएचबी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपी प्रिसिंपलविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
याच गुन्ह्यांत त्याला शनिवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. कॉलेजच्या प्रिसिंपलकडून अल्पवयीन कॉलेज तरुणीचा झालेल्या विनयभंगाच्या घटनेने इतर शिक्षकासह पालक तसेच विद्यार्थ्यामध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.