पूर्ववैमस्नातून ३२ वर्षांच्या तरुणाची तिक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या
हत्येनंतर पळून गेलेल्या सहाही मारेकर्यांना अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२३ जुलै २०२४
मुंबई, – पूर्ववैमस्नातून सिद्धार्थ कांबळे या ३२ वर्षांच्या तरुणाची सहाजणांच्या टोळीने तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केल्याची घटना रविवारी चेंबूर परिसरात घडली. या हल्ल्यात सिद्धार्थचा मित्र विकास शाहिदास धेंडे हादेखील जखमी झाला होता. याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी हत्या, हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन पळून गेलेल्या सहाही मारेकर्यांना वेगवेगळ्या परिसरातून अटक केली. सिताराम शहाजी जगताप, सुरेश ऊर्फ सुरज शहाजी जगताप, रुपेश जयंत वैराळे, सागर तुकाराम कांबळे, सुधाकर जगन्नाथ अवसरमल, रुपेश तुकाराम कांबळे अशी या सहाजणांची नावे आहेत. अटकेनंतर या सर्वांना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील सिताराम, रुपेश आणि सुरेश हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध काही गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. रविवारी रात्री घडलेल्या या हत्येच्या घटनेने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
ही घटना रविवारी रात्री साडेनऊ वाजता वाजता चेंबूरच्या वाशीनाका, मुकूंदनगर, इमारत क्रमांक सहासमोरील इमारत क्रमांक अकरा आणि बारादरम्यान घडली. याच परिसरातील आम्रपाली सोसायटीमध्ये ३४ वर्षांचा तक्रारदार विकास शाहिदास धेंडे हा त्याच्या कुटुंबियांसोबत राहत असून सध्या बेरोजगार आहे. याच परिसरात राहणारा सिद्धार्थ हा त्याचा मित्र आहे. अटक आरोपी आणि सिद्धार्थ यांच्या पूर्वीचा वाद होता. याच वादातून त्यांच्यात नेहमी खटके उडत होते. रविवारी रात्री साडेनऊ वाजता सिद्धार्थ आणि विकास धेंडे हे गप्पा मारत होते. यावेळी तिथे आरोपी आले आणि त्यांनी पूर्वी झालेल्या वादातून त्यांच्याशी भांडण सुरु केले होते. हा वाद विकोपास गेल्यानंतर त्यांनी सिद्धार्थला बेदम मारहाण केली होती. त्यामुळे विकासने त्यांच्यातील भांडण मिटविण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग आल्याने आरोपींनी सिद्धार्थसह विकासवर तिक्ष्ण हत्याराने वार केले होते. या हल्ल्यात ते दोघेही गंभीररीत्या जखमी झाले होते. हल्ल्यानंतर सर्व आरोपी पळून गेले होते. तिक्ष्ण हत्याराने केलेल्या हल्ल्यात सिद्धार्थला गळ्यावर, हाताच्या मनगटाला, पोटाला तर विकासला पाठीवर, डोक्यावर, कानावर आणि गालावर गंभीर दुखापत झाली होती. रक्तबंबाळ झालेल्या विकास आणि सिद्धार्थ यांना स्थानिक रहिवाशांनी तातडीने शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे उपचार सुरु असताना सिद्धार्थला डॉक्टरांनी मृत ेेेेघोषित केले तर विकासला उपचारानंतर सोडून देण्यात आले.
ही माहिती मिळताच आरसीएफ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. विकासकडून घडलेला प्रकार समजताच पोलिसांनी त्याच्या तक्रारीवरुन सहाही आरोपीविरुद्ध १०३ (१), १०९, ६१ (२), ११५ (२), ३५२, ३५१ (३), १८९ (२), १९१ (२), (३), १९० भारतीय न्याय संहिता सहकलम ४, २५ शस्त्र अधिनियम सहकलम ३७ (१), (अ), १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना सोमवारी दुपारी वेगवेगळ्या परिसरातून या कटातील मुख्य आरोपी सिताराम जगतापसह इतर पाचजणांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या सर्वांना पोलीस बंदोबस्तात लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडीत आहे. चौकशीत सिताराम जगताप, सुरेश जगताप आणि रुपेश वैराळे हे तिघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. सितारामविुद्ध सहा, सुरेशविरुद्ध तीन तर रुपेशविरुद्ध एक गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.