रिषभ ज्वेलर्समधील १.९३ कोटीच्या रॉबरीचा पर्दाफाश

चोरीच्या बहुतांश मुद्देमालासह दोन्ही आरोपींना अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२ जानेवारी २०२५
मुंबई, – आग्रीपाडा येथील रिषभ ज्वेलर्स दुकानात सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा बहाणा करुन झालेल्या १ कोटी ९३ लाख रुपयांच्या रॉबरीचा पर्दाफाश करण्यात अखेर आग्रीपाडा पोलिसांसह गुन्हे शाखेला यश आले आहे. रॉबरीनंतर उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशात पळून गेलेल्या दोन्ही मुख्य आरोपींना पोलिसांनी चोरीच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह शिताफीने अटक केली आहे. संतोषकुमार आणि विनोद लखन पाल अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले आहे. या दोघांनी घातक शस्त्रांचा धाक दाखवून ही लुटमार केल्याची कबुली दिली. रॉबरीनंतर पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना काही तासांत गजाआड करणार्‍या आग्रीपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय निंबाळकर व गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक सदानंद येरेकर यांच्या पथकाने वरिष्ठांकडून कौतुक केले आहे.

ही घटना रविवारी २९ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी साडेतीन वाजता भायखळा येथील सातरस्ता, साने गुरुजी मार्ग, लक्ष्मीदास वाडीतील शॉप क्रमांक चौदामध्ये घडली. भवरलाल धरमचंद जैन हे चिंचपोकळी बालमुकूंद मार्ग, चंद्रदर्शन हाईट्स अपार्टमेंटमध्ये राहत असून ते ज्वेलर्स व्यापारी आहेत. त्यांच्या मालकीचे लक्ष्मीदास वाडीत रिषभ ज्वेलर्स नावाचे एक सोन्या-चांदीचे दुकान आहे. रविवारी २९ डिसेंबरला दुपारी ते त्यांच्या दुकानात बसले होते. यावेळी त्यांच्या दुकानात दोन तरुण आले. या दोघांनी सोन्याचे दागिने खरेदी करायचे आहे असे सांगून त्यांना दागिने दाखविण्यास सांगितले. त्यामुळे ते दोघांनाही दागिने दाखवत होते. यावेळी काही कळण्यापूर्वीच या दोघांनी घातक शस्त्रांचा धाक दाखवून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांना मारहाण करुन दोरीच्या सहाय्याने त्यांचे हातपाय बांधले. त्यानंतर या दोघांनीही दुकानातील विविध सोन्या-चांदीचे दागिने, कॅश आदी मुद्देमाल पळवून नेला. त्यात १ कोटी ९१ लाख ७० हजार रुपयांचे २४५८ ग्रॅम वजनाचे विविध सोन्याचे दागिने, १ लाख ७६ हजार रुपयांचे २२०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, १५ हजार रुपयांची कॅश, एक वायफाय राऊटर असा १ कोटी ९३ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमालाचा समावेश होता.

दोन्ही आरोपी पळून गेल्यानंतर काही वेळाने त्यांनी स्वतची सुटका केली आणि ही माहिती आग्रीपाडा पोलिसांना दिली होती. ही माहिती मिळताच आग्रीपाडा पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी भवरलाल जैन यांची जबानी नोंदवून घेतल्यांनतर घडलेला प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध रॉबरीचा गुन्हा दाखल केला होता. दिवसाढवळ्या घडलेल्या या रॉबरीच्या घटनेने परिसरातील व्यापारी वर्गात प्रचंड खळबळ उडाली होती.

या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय निंबाळकर यांच्या पथकाने उत्तरप्रदेशातून संतोषकुमारला ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच विनोद पालच्या मदतीने ही रॉबरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचे बहुतांश सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत केले आहे. या कारवाईनंतर गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक सदानंद येरेकर यांच्या पथकाने रॉबरीनंतर मध्यप्रदेशात गेलेल्या विनोद पाल याला शिताफीने अटक केली. अटकेनंतर त्याला आग्रीपाडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. रॉबरीनंतर अवघ्या काही तासांत दोन्ही आरोपींना अटक करुन पोलिसांनी चोरीचा बहुतांश मुद्देमाल जप्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page