स्वस्तात रियालच्या नावाने गंडा घालणार्या महिलेस अटक
रियालसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
21 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – स्वस्तात सौदी अरेबियाचे रियाल देण्याच्या नावाने एका मोबाईल व्यावसायिकाची फसवणुक करुन पळून गेलेल्या महिलेस माहीम पोलिसांनी अटक केली. राणीदेवी मुकेशकुमार दास असे या आरोपी महिलेचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत ती सध्या पोलीस कोठडीत आहे. या गुन्ह्यांत तिला अनिल नावाच्या एका मित्राने मदत केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
पवन रामकृष्ण हालवाई हे मोबाईल व्यावसायिक असून ते सध्या त्यांच्या कुटुंबियांसोबत मालाड परिसरात राहतात. त्यांचा माहीम येथील टी. एच कटारिया रोड, संदेश हॉटेलजवळ बालाजी मोबाईल हब नावाचे एक दुकान आहे. जून महिन्यांत त्यांच्या दुकानात अनिल नावाचा एक व्यक्ती आला होता. त्याने त्यांना सौदी अरेबियाचे शंभर रियाल दाखवून त्यांना स्वस्तात रियाल देण्याचे आमिष दाखविले होते. सुरुवातीला त्यांनी नकार दिला, मात्र तो त्यांच्याकडे खूप विनंती करु लागला. त्याच्या परिचित महिलेकडे शंभर रियाल नोटा आहेत. तिला वैद्यकीय उपचारासाठी पैशांची गरज आहे. त्यामुळे या सर्व नोटा त्यांना स्वस्तात देतो असे त्याने सांगितले.
त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्याने त्यांना एक नोट ठेवण्यासाठी दिले होते. ही नोट त्यांनी जवळच्या डॉलर चेंज करणार्या दुकानात दिली होती. यावेळी त्याने त्यांना या नोटाच्या बदल्यात दिड हजार रुपये दिले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडून एक हजाराप्रमाणे शंभर रियाल खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. ठरल्याप्रमाणे अनिलने त्यांना सांताक्रुज येथील व्ही. एन देसाई हॉस्पिटलजवळ बोलाविले होते. तिथे गेल्यानंतर अनिलसोबत असलेल्या एका महिलेने त्यांना शंभर रियाल दिले. त्यानंतर ते दोघेही त्यांच्याकडून एक लाख रुपये घेऊन तेथून निघून गेले.
काही वेळानंतर त्यांनी नोटा पाहण्यासाठी बॅग उघडली होती, यावेळी त्यांना बॅगेत रियाल नव्हते. त्यामुळे त्यांनी या दोघांचा शोध घेतला, मात्र ते दोघेही पळून जाण्यात यशस्वी झाले होते. या दोघांनी स्वस्तात रियाल देण्याचे आमिष दाखवून त्यांची एक लाखांची फसवणुक केली होती. या घटनेनंतर त्यांनी माहीम पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून त्यांचा शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या चार महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या राणीदेवी दास या महिलेस पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत तिनेच तिच्या एका मित्राच्या मदतीने ही फसवणुक केल्याची कबुली दिली. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर तिला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे.