मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ डिसेंबर २०२४
मुंबई, – भारतीय रेल्वेत नोकरीच्या आमिषाने ५८ वर्षांच्या निवृत्त शासकीय कर्मचार्याची एका ठगाने सुमारे दहा लाखांची फसवणुक केल्याची घटना मुलुंड परिसरात उघडकीस आली आहे. प्रथमेश शिरीष लाड असे या ठगाचे नाव असून तो फसवणुकीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. रेल्वेत नोकरीच्या आमिषाने प्रथमेशने आतापर्यंत अनेक बेरोजगार तरुण-तरुणींची लाखो रुपयांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पळून गेलेल्या प्रथमेशच्या अटकेसाठी नवघर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
यातील तक्रारदार लक्ष्मण तुळशीराम पोखरकर हे मुलुंडच्या म्हाडा कॉलनीतील रहिवाशी आहेत. या ठिकाणी ते त्यांच्या पत्नी आणि मुलासोबत राहतात. त्यांच्या मुलीचे लग्न झाले असून ती सध्या नवी मुंबईत तिच्या सासरी राहते. ते महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभागातून निवृत्त झाले आहेत. त्यांचा मुलगा बेरोजगार असल्याने त्याच्या नोकरीसाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. याबाबत त्यांनी त्यांच्या नातेवाईकांसह मित्रांना सांगितले होते. याच दरम्यान त्यांचे नातेवाईक दिपक निवृत्ती पोखरकर या नातेवाईकाने भारतीय रेल्वेमध्ये नोकरी भरती सुरु असल्याचे सांगून त्यांची सुजाता पाटील या महिलेशी ओळख करुन दिली होती. तिने प्रथमेश लाड याने तिच्या मुलाला आणि भाचीला रेल्वेमध्ये भरती केले असून तिचा मुलगा सध्या रेल्वे विभागात प्रशिक्षण घेत आहे तर तिच भाची सातारा येथे मुख्य स्टेशन अधिक्षक म्हणून कामाला असल्याचे सांगितले. तिने प्रथमेश हा तिचा मानलेला मुलगा असून तो सधया सीएसएमटी येथे रेल्वे अधिकारी म्हणून कामाला होता. सध्या त्याची बदली जयपूर येथे झाली आहे. त्याच्या ओळखीतून त्यांच्या मुलांना रेल्वेत मिळेल. प्रत्येक उमेदवारामागे तो आठ लाख रुपये घेतो असेही सांगितले.
रेल्वेत नोकरी मिळत असल्याने त्यांनीही पैसे भरण्याची तयारी दर्शविली होती. काही दिवसांनी त्यांनी दिपक आणि सुजाताच्या सांगण्यावरुन प्रथमेश लाडच्या बँक खात्यात टप्याटप्याने दहा लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. ७ मे २०२४ रोजी त्यांचे दोन्ही मुले साहिल आणि विवाहीत मुलगी स्नेहल राकेश चौधरी यांच्या नावाने रेल्वेचा लोगो आणि रेल्वे अधिकार्यांची सही असलेले नियुक्तीपत्र मेलवर आले होते. या पत्रात या दोघांनाही १५ मे ते २० मे या कालावधीत मध्य रेल्वेच्या मुख्य अधिकार्यांना दुपारी दोन ते सायंकाळी सात या वेळेत भेटण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे ते दोघेही तिथे नियमित जात होते. मात्र तिथे त्यांची कुठल्याही अधिकार्यांनी भेट घेतली नाही. त्यामुळे त्यांनी प्रथमेशला कॉल करुन नक्की कुठे जायचे आणि कुठल्या अधिकार्याला भेटायचे याबाबत विचारणा केली होती. मात्र तो त्यांना काहीच माहिती सांगत नव्हता. त्यांनी तिथे गेल्यानंतर त्याला संबंधित अधिकार्याचे फोटो आणि लोकेशन पाठविले, मात्र त्याने त्यांना प्रतिसाद दिला नाही.
हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी प्रथमेशविषयी माहिती काढण्यास सुरुवात केली. यावेळी तो घाटकोपर येथे राहत असल्याचे समजले. तिथे त्याची चौकशी केल्यानंतर प्रथमेशने रेल्वेत नोकरी देतो असे सांगून आतापर्यंत अनेकांची फसवणुक केली आहे. त्यांच्याकडून लाखो रुपये घेऊन तो पळून गेल्याची माहिती समजली होती. हा प्रकार लक्षात येताच लक्ष्मण पोखरकर यांनी नवघर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून प्रथमेशविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. प्रथमेश हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.