कुर्ला-सायन दरम्यान लोकलसमोर 36 वर्षांच्या व्यक्तीची आत्महत्या
आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
17 एप्रिल 2025
मुंबई, – कौटुंबिक वादातून मारुफ अहमर या 36 वर्षांच्या व्यक्तीने लोकलसमोर आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मारुफला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याच्या पत्नीसह सासू आणि मेहुणा अशा तिघांविरुद्ध कुर्ला रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हासीना खातून, नजमुनिसा गुरिबउल्ला आणि नसीम अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांनी मारुफचा मानसिक व शारीरिक शोषण करुन त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना शुक्रवारी सव्वाआठ ते नऊच्या सुमारास कुर्ला-सायन रेल्वे स्थानकादरम्यान घडली.
हाजरा खातून वसीम अहमद खान ही 39 वर्षांची महिला कुर्ला येथील एलबीएस मार्गावरील कुर्ला गार्डनजवळील हबीबुल्लाह चाळीत राहते. मृत मारुफ हा तिचा भाऊ असून तो कुर्ला परिसरात त्याच्या पत्नीसोबत राहत होता. त्याच्या पत्नीचे चारित्र्य चांगले नव्हते. पत्नीच्या चारित्र्यावरुन या दोघांमध्ये सतत वाद होत होते. अलीकडेच मारुफला त्याच्या पत्नीचे एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती समजली होती. त्यातून त्यांच्यातील वाद विकोपास गेले होते. यावेळी त्याची भावजय, तिचे आई, बहिण आणि मेहुणा त्याचा मानसिक शोषण करत होते. त्याच्याकडे सतत पैशांची मागणी करत होते. पैसे दिले नाहीतर त्याच्याविरुद्ध बोगस तक्रार करुन त्याच्याविरुद्ध कारवाईची धमकी देत होते. या मानसिक शोषणाला मारुफ हा कंटाळून गेला होता.
गेल्या काही दिवसांपासून तो प्रचंड मानसिक तणावात होता. शुक्रवारी 11 एप्रिलला रात्री सव्वाआठ वाजता त्याने कुर्ला आणि सायन रेल्वे स्थानकादरम्यान लोकलसमोर उभे राहून आत्महत्या केली होती. ही माहिती मिळताच कुर्ला रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्याच्याकडे मिळालेल्या कागदपत्रावरुन त्याची ओळख पटली होती. त्यानंतर ही माहिती त्याची बहिण हाजरा खातून खान हिला देण्यात आली होती. शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह त्यांना सोपविण्यात आला होता. संबंधित आरोपींच्या मानसिक शोषणाला त्याने आत्महत्या केली होती. त्यामुळे बुधवारी 16 एप्रिलला हाजरा खान हिने कुर्ला रेल्वे पोलिसांत हासीना खातून, नजमुनिसा गुरिबउल्ला आणि नसीम या तिघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर या तिन्ही आरोपीविरुद्ध पोलिसांनी मारुफचा मानसिक व शारीरिक शोषण करुन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून अद्याप कोणालाही अटक झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.