मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१९ ऑगस्ट २०२४
मुंबई, – भारतीय रेल्वेत टिसी पदावर नोकरीच्या आमिषाने एका तरुणाची दोन भामट्यांनी फसवणुक केल्याचा प्रकार कांदिवलीतील चारकोप परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपीविरुद्ध बोगस दस्तावेज देऊन पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. संतोष पाटील आणि रखमाजी सोमनाथ ईरकर अशी या दोघांची नावे असून या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपासत करत आहेत.
३० वर्षांचे तक्रारदार सिद्धेश सुधाकर धामापुरकर हे कांदिवलील चारकोप परिसरात राहतात. जुलै २०२१ रोजी त्यांची आरोपींशी ओळख झाली होती. या ओळखीदरम्यान आरोपींनी त्यांची भारतीय रेल्वेत ओळख असल्याची बतावणी करुन त्यांच्या विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या परिचित कोणीही नोकरीसाठी इच्छुक असल्यास आपण त्याच्या नोकरीसाठी नक्कीच प्रयत्न करु असे सांगितले होते. त्यामुळे सिद्धेश धामापूरकरने त्याच्या बहिणीसाठी त्यांच्याकडे शिफारस केली होती. यावेळी या दोघांनी तिला कायमस्वरुपी टिसी पदावर नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. याच नोकरीसाठी त्यांनी त्यांच्याकडून पाच लाख चाळीस हजार रुपये घेतले होते. काही दिवसांनी त्यांनी दिल्लीच्या रेल्चेच्या चीफ पर्सनल अधिकारी यांच्या स्वाक्षरी असलेल्या नियुक्तीपत्र देऊन तिचे काम झाल्याचे सांगितले होते.
मात्र तिला नोकरीवरुन रुजू करण्यावरुन ते दोघेही सतत टाळाटाळ करत होते. त्यामुळे त्यांनी या नियुक्तीपत्राची शहानिशा केली असता ते नियुक्तीपत्र बोगस असल्याचे उघडकीस आले. या दोघांनी टिसी पदावर नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून पैसे घेऊन बोगस नियुक्तीपत्र देऊन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी चारकोप पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर संतोष पाटील आणि रखमाजी ईरकर यांच्याविरुद्ध पोलिसांनी ४०६, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींचा शोध सुरु असून लवकरच त्यांच्यावर अटकेची कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.