एक महिन्यांपूर्वीच रोहितने ओलीस ठेवण्याचा प्लान बनविला होता

प्लानचा एक भाग म्हणून ऑडिशनचे नाटक केल्याचे उघडकीस

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
31 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – पवईतील स्टुडिओमध्ये लहान मुलांना ओलीस ठेवण्याची योजना या संपूर्ण कटाचा मास्टरमाईंट रोहित आर्या याने एक महिन्यांपूर्वीच बनविली होती. त्याच्याच एक भाग म्हणून ऑडिशनचे नाट केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. ठरल्याप्रमाणे त्याने ऑडिशनच्या शेवटच्या दिवशी ओलीस नाट्याचे शूटींग करण्याची योजना बनविली होती.

रोहित आर्याने लेट्स चेंज पर्व चारचे निर्मितीचा निर्णय घेतला होता. या पर्वांचा तोच लेखक-निर्माता-दिग्दर्शक होता. त्यासाठी त्याला काही लहान मुलांची गरज होती. त्यामुळे त्याने मुंबईसह महाराष्ट्रातील विविध शहरातील बारा ते पंधरा वयोगटातील मुलांना वेबसिरीजच्या ऑडिशनसाठी मुंबईत बोलाविले होते. पवईतील स्टुडिओमध्ये या मुलांचे चार दिवसांपासून ऑडिशन सुरु होते. ऑडिशनदरम्यान त्यांनी 36 मुलांची निवड केली होती. त्यातून त्याने निवडक सतरा मुले निवडली आणि त्यांना स्टुडिओच्या पहिल्या मजल्यावरील एका रुममध्ये नेले होते. या मुलांसोबत त्याला त्यांच्या पालकांना ओलीस ठेवायचे होते, मात्र ऐन वेळेस त्याने त्याची योजना बाजूला ठेवून फक्त मुलांवर फोकस केला होता. शेवटच्या दिवशी त्याने ओलीस नाट्याचे शूटींग करण्याचे ठरविले होते.

याबाबत त्याने त्याच्या युनिटच्या कर्मचार्‍यांना आधीच माहिती दिली होती. त्यामुळे रोहित सकाळी तिथे लवकर आला होता. रुममध्ये आणल्यानंतर त्याने काही मुलांचे हातपाय बांधले, त्यांच्या तोंडाला टेप लावले होते. त्यामुळे सर्व मुले प्रचंड घाबरली होती. काही मुलांनी ओरडाओरड करुन रडायला सुरुवात केली होती. हा प्रकार बाहेर असलेल्या पालकांना संशयास्पद वाटतला होता. याबाबत विचारणा केल्यानंतर त्याने आतमध्ये शूटींग सुरु असल्याचे सांगितले होते. मात्र मुलांचा रडण्याचा आवाज थांबत नसल्याने त्यांनी त्यांना एअरगनने धमकाविण्याचा प्रयत्न केला. मुलांकडून ही माहिती नंतर त्यांच्या पालकांना देण्यात आली होती.

याबाबत मुलांसह त्यांच्या पालकांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या मुलांनी रोहितने त्यांना लोखंडी रॉडचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही सांगितले. या मुलांसोबत दोन वयोवृद्धांना त्याने ओलीस ठेवले होते. सुरुवातीला ओलीस ठेवल्याचा सीन सुरु असल्याचे त्यांना वाटले, मात्र नंतर रोहितने त्यांना खरोखर ओलीस ठेवल्याचे समजले. त्यामुळे त्यांनाही प्रचंड मानसिक धक्का बसला होता. गुन्ह्यांच्या दिवशी रोहितने तिथे एअरगन, रॉड, ज्वनशील पदार्थ आणले होते. याबाबत कोणालाही काहीही माहिती नव्हती.
रोहितने हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी सेन्सर बसविले
लहान मुलांना ओलीस ठेवल्यानंतर सर्व हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठ रोहितने खिडक्यांना सेन्सर बसविल्याचे वृत्त आहे. ओलीस ठेवण्यापूर्वी त्याने स्टुडिओच्या खिडक्यांना आणि दरवाज्यांना सेन्सर लावले होते. तसेच स्वरक्षणासाठी त्याने तिथे सीसीटिव्ही कॅमेरा लावून त्याचे मॉनिटर करत होता. रोहितने लेट्स चेंज पर्व चारचे शूटींगचा निर्णय घेतला होता. या वेबसिरीजसाठी त्याला काही लहान मुलांची गरज होती. त्यामुळे पवईतील स्टुडिओमध्ये त्याने काही मुलांची ऑडिशन सुरु केले होते. गेल्या चार दिवसांपासून मुलांचे ऑडिशन सुरु होते. गुरुवारी रोहित हा प्रचंड चिडचिडा झाला होता. मुलांनी गोंधळ घालू नये तसेच ते शांत बसावे म्हणून सर्व मुलांना खाद्यपदार्थासह चॉकलेट आणि कोल्डड्रिंंक आणलेह ोते. त्यानंतर त्याने सर्व मुलांना एका रुममध्ये जाण्यास सांगितले होते. त्या ठिकाणी एक कापड ठेवण्याचे होते. याच कपड्यावर त्याने ज्वनशील रसायन टाकले होते. शूटींगसाठी तसे केल्याचे त्याने युनिटमधील कर्मचार्‍यांना सांगितले होते. त्याला क्राईन सीन रिक्रिशन करुन मुलांना कशा प्रकारे ओलीस ठेवले जाते याबाबत जाणून घ्यायचे होते. मात्र बराच वेळ मुले आणि रोहित रुममधून बाहेर आले नाही, तेव्हा त्यांनी पोलिसांना ही माहिती दिल्याचे तपासात उघडकीस आले.
रोहित आर्या प्रकरणाचा तपास दोन युनिटकडे
पवईतील स्टुडिओमध्ये ऑडीशनसाठी बोलावून सतरा मुलांसह दोन वयोवृद्धांना ओलीस ठेवणार्‍या रोहित आर्या याचा नंतर पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला होता. त्यामुळे या संपूर्ण घटनेची पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी गंभीर दखल घेत त्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद केली आहे. त्यातील एका एडीआरच्या गुन्ह्यांचा तपास युनिट दोन तर ओलीस नाट्यानंतर घडलेल्या घटनेचा तपास युनिट आठकडे सोपविण्यात आला आहे. या दोन्ही युनिटच्या प्रमुखांना लवकरात लवकर चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान रोहित आर्याचा मृतदेह जे. जे रुग्णालयात पाठविण्यात आला होता. शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी अद्याप कोणीही आले नाही. शुक्रवारी त्याचा एक नातेवाईक रुग्णालयात आला होता. त्यामुळे त्याची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. त्यांनतर त्याचा मृतदेह नातेवाईकाकडे सोपविला जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
पवई पोलिसांकडून क्राईम सीन रिक्रिशन
गुरुवारी रोहित आर्याने पवईतील स्टुडिओमध्ये घडवून आणलेल्या ओलीस नाट्याने मुंबईसह संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेची स्वत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश पोलीस आयुक्त देवेन भारती यांना दिले होते. त्यामुळे रात्री उशिरा पवई पोलिसांनी रोहितविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. ओलीस ठेवलेल्या सतरा मुलांसह दोन वयोवृद्धांची सुटका केल्यानंतर त्यांच्यासह त्यांच्या पालकांची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात आली आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनंतर पवई पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा क्राईम सीन रिक्रेशन करण्याचा निर्णय घेतला होता. ठरल्याप्रमाणे शुक्रवारी पवई पोलिसांचे एक विशेष पथक पवईतील रा स्टुडिओमध्ये आले होते. यावेळी पोलिसांनी या घटनेचा क्राईम सीन रिक्रिशन केले होते. रोहितने मुलांना ओलीस ठेवले होते, त्यापूर्वी तो मुलांशी कशा प्रकारे वागला, त्यांना काय खाण्यासाठी दिले. सायंकाळपर्यंत या क्राईन रिक्रिशन करण्यात आले होते. त्याचा पोलिसांकडून व्हिडीओ बनविण्यात आला होता.
रोहितचा मूळचा गुजरातचा; दोन वर्षांपूर्वी मुंबईत शिफ्ट झाला
रोहित आर्या हा मूळचा गुजरातच्या आणंदचा रहिवाशी असून काही वर्षांपूर्वी तो पुण्यात आणि दोन वर्षांपूर्वी मुंबईत शिफ्ट झाला होता. त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी आणि दहा वर्षांच्या एका मुलाचा समावेश आहे. गुरुवारी दुपारी ही घटना घडली त्यावेळेस त्याची पत्नी आणि मुलगा अहमदाबाद येथे होते. त्यांना सोशल मिडीयावरुन हा प्रकार समजला होता. रोहितला पोलिसांनी केलेल्या गोळीबारात जखमी झाला होता, त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले होते. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे. जे रुग्णालयात पाठविण्यात आला होता. त्याचे कपडे पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या कपड्यात केमिकल असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ते कपडे फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहे. त्याचा अहवाल लवकरच गुन्हे शाखेला पाठविण्यात येणार आहे. या अहवालानंतर त्याच्या कपड्याला कुठले केमिकल होते याचा उलघडा होणार आहे. ते केमिकल त्याने कोठून आणले होते याचा पोलिसांकडून तपास केला जाणार आहे.
अंत्यविधीसाठी रोहितचा मृतदेह पुण्याला रवाना
पोलिसांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेला आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर मृत घोषित केलेल्या रोहितचा मृतदेह रात्री उशिरा त्याच्या नातेवाईकांकडे सोपविण्यात आला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह अंत्यविधीसाठी पुण्याला नेण्यात आला होता. त्यासाठी नातेवाईकांनी एका रुग्णवाहिकीची व्यवस्था केली होती. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर रोहितचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांना सोपविण्यात आला होता. त्यानंतर रात्री उशिरा त्याचे पार्थिव अंत्यविधीसाठी पुण्याला रवाना झाला होता. यावेळी त्याचे काही परिचित नातेवाईकांसह मित्रांचा समावेश होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page