सचिन कुर्मी हत्येप्रकरणी शिंदे गटाच्या पदाधिकार्याला अटक
हत्येतील मारेकर्यांना लॉजिस्टिक मदत केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
८ जानेवारी २०२५
मुंबई, – गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यांत राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाचे भायखळा विधानसभा मतदारसंघातील तालुका अध्यक्ष सचिन कुर्मी यांच्या हत्येप्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा पदाधिकारी असलेला दिलीप रघुनाथ वागस्कर (५८) याला बुधवारी सकाळी गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी मोक्का कायद्यांतर्गत अटक केली. अटकेनंतर त्याला मोक्का कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्याला गुरुवार १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हत्येतील मारेकर्यांना लॉजिस्टिक मदत केल्याचा दिलीप वागस्करवर आरोप आहे. यापूर्वी याच गुन्ह्यांत आनंदा अशोक काळे ऊर्फ अन्या, विजय ज्ञानेश्वर काकडे ऊर्फ पप्या, प्रफुल्ल प्रविण पाटकर आणि गोविंद यादव या चौघांना पोलिसांनी अटक केली होती. दिलीप हा या गुन्ह्यांतील पाचवा आरोपी असल्याचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले.
गेल्या वर्षी ४ ऑक्टोंबर घोडपदेव येथे सचिन कुर्मी यांची तीन अज्ञात व्यक्तींनी तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केली होती. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आनंद काळे, विजय काकडे आणि प्रफुल्ल पाटकर या तिघांना भायखळा पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यांचा तपास नंतर गुन्हे शाखेच्या युनिट तीनकडे सोपविण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करताना डिसेंबर महिन्यांत या गुन्ह्यांत मोक्का कायदा लावण्यात आला होता. त्यानंतर मोक्का कायद्यांतर्गत तिन्ही आरोपींचा पुन्हा ताबा घेण्यात आला होता. त्यांच्या चौकशीनंतर गोविंद यादवला पोलिसांनी वांद्रे येथून अटक केली होती. त्याने मारेकर्यांना सिमकार्ड पुरविले होते.
याच चौकशीतून दिलीप वागस्कर याचे नाव समोर आले होते. तो शिंदे गटाचा पदाधिकारी आणि बड्या राजकीय नेत्याचा जवळचा सहकारी आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून त्याची पोलिसाकडून चौकशी सुरु होती. या चौकशीदरम्यान त्याचा सहभाग उघडकीस येताच त्याला बुधवारी पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत त्याला मोक्का कोर्टाने १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याने मारेकर्यांना लॉजिस्टिक मदत केल्याचा आरोप आहे. त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.