मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ सप्टेंबर २०२४
मुंबई, – साकिनाका मेट्रो स्टेशनजवळ असलेल्या मोबाईल दुकानात बुधवारी घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात व्यक्तीने दुकानातील शॉप तोडून आतील विविध कंपनीचे महागडे मोबाईल, कॅश, सीसीटिव्हीचा डिव्हीआर असा ३१ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले आहे. याप्रकरणी साकिनाका पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपींचा परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने शोध सुरु केला आहे.
जितेंद्रकुमार हेमाराम पुरोहित हे व्यावसायिक असून भाईंदर परिसरात राहतात. त्यांच्या मालकीचे साकिनाका मेट्रो स्टेनश परिसरात प्रिंस द मोबाईल नावाचे दुकान आहे. या दुकानात मोबाईल खरेदी-विक्रीसह दुरुस्तीचे काम चालते. त्यांच्याकडे एकूण सहा कर्मचारी कामाला आहे. मंगळवारी रात्री उशिरा ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करुन घरी गेले होते. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता त्यांचा कर्मचारी हरीसिंग हा दुकाना आला होता. यावेळी त्याला दुकानात चोरी झाल्याचे दिसून आले. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याने जितेंद्रकुमारसह साकिनाका पोलिसांना ही माहिती दिली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांना दुकानाचे लॉक तोडून अज्ञात व्यक्तीने प्रवेश केल्याचे दिसून आले. त्यानंतर ड्राव्हरमधील कॅश, विविध मोबाईल, सीसीटिव्ही कॅमेर्याचा डिव्हीआर असा ३१ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल या व्यक्तीने चोरी करुन पलायन केले होते. याप्रकरणी जितेंद्रकुमार पुरोहित यांच्या तक्रारीनंतर साकिनाका पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदविला आहे. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपीच्या अटकेसाठी विशेष टिम नियुक्ती केली आहे. या टिमने परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेऊन पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला आहे.