प्रसिद्धीसाठी सलमान खानला धमकी दिल्याचा संशय

आरोपी बनवारीलाल गुजरच्या पोलीस कोठडीत वाढ

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ जून २०२४
मुंबई, – सोशल मिडीयाच्या माध्यातून दबंग सिनेअभिनेता सलमान खान याला जिवे मारण्याची धमकी देण्यामागे बनवारीलाल गुजर या आरोपीचा हेतू अद्याप स्पष्ट झाला नसला तरी या धमकी देण्यामागे त्याला सोशल मिडीयावर केवळ प्रसिद्धी मिळवायची होती असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने बनवारीलालला मंगळवारी दुपारी पुन्हा किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याच्या पोलीस कोठडीत गुरुवार २० जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्याने आतापर्यंत १९ ईमेल आयडी तयार केले असून या सर्व मेलची सध्या पोलिसांकडून तपासणी सुरु केली आहे. दरम्यान त्याचा मोबाईल फारेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आला असून त्याचा अहवाल लवकरच पोलिसांना प्राप्त होणार आहे.

काही दिवसांपूर्वी अरे छोडो या यूट्यूब चॅनेलवर एका अज्ञात व्यक्तीने सिनेअभिनेता सलमान खान याला जिवे मारण्याची धमकी दिली होती. हा व्हिडीओ सलमानच्या एका मित्राच्या निदर्शनास येताच त्याने खान कुटुंबियांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर त्यांनी दक्षिण प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल विभागात तक्रार केली होती. सलमानच्या घराजवळ झालेल्या गोळीबारानंतर सोशल मिडीयावर त्याला आलेल्या धमकीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेतली हाती. त्यामुळे सायबर सेल पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादवीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. हा तपास सुरु असताना सोशल मिडीयावर धमकी देणारा आरोपी राजस्थान येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर खंडणीविरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी आरोपीची माहिती काढून राजस्थान येथील बोर्डा गावातून बनवारीलाल गुजर या संशयिताला ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच सलमानला जिवे मारण्याची धमकी देणारे व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड केल्याची कबुली दिली. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला रविवारी दुपारी राजस्थान येथून मुंबईत पुढील चौकशीसाठी आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला १८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

आतापर्यंतच्या चौकशीत बनवारीलाल याचे अरे छोडो यार नावाचे एक यूट्यूब चॅनेल असून या चॅनेलवरुन त्याने सलमानला धमकी दिली होती. त्याने धमकीचे दहाहून अधिक व्हिडीओ अपलोड केले असून त्यात त्याने सलमानला धमकी देताना त्याला कशा प्रकारे मारले जाऊ शकते याबाबत खुलासा केला आहे. गावात दहशत निर्माण होण्यासाठी त्यानेच ही धमकी देताना तो बिष्णोईचा खास सहकारी असल्याचे सांगत होता. त्याच्याकडून पोलिसांनी एक मोबाईल जप्त केला असून त्यात काही आक्षेपार्ह नोंदी दिसून आल्या आहेत. हा मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आला आहे. त्यातील डिलीट माहिती काढण्याचे काम सुरु आहे. बनवारीलालने १९ ईमेल आयडी बनविल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या मेल आयडीचा त्याने कशासाठी वापर केला याचा आता पोलिसांकडून तपास सुरु आहे. तसेच त्याचा यूट्यूब चॅनेल पोलिसांनी ब्लॉक केला आहे. त्याने धमकीचा व्हिडीओ प्रसिद्धीसाठी तसेच जास्तीत जास्त व्हूव्हर मिळावे यासाठी केल्याचा पोलिसांना संशय आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page