सलमान खान फायरिंगप्रकरणी आरोपीस राजस्थानातून अटक
अनमोल बिष्णोईच्या संपर्कात; लॉजिस्टिक सपोर्ट दिला होता
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
७ एप्रिल २०२४
मुंबई, – एप्रिल महिन्यांत वांद्रे येथील सिनेअभिनेता सलमान खान याच्या घराजवळील फायरिंगप्रकरणी पाचव्या आरोपीस गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. मोहम्मद रफिक चौधरी असे या आरोपीचे नाव असून तो बिष्णोई टोळीशी संबंधित आहे. त्याच्यावर फायरिंगच्या गुन्ह्यांतील आरोपींना आर्थिक मदतीसह लॉजिस्टिक सपोर्ट दिल्याचा आरोप आहे. मोक्का कायद्यांतर्गत अटक केल्यानंतर त्याला मंगळवारी दुपारी मोक्का कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ १४ एप्रिलला दोन बाईकस्वारांनी फायरिंग केले होते. फायरिंगनंतर दोन्ही आरोपी बाईकवरुन पळून गेले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच सुरतच्या भूज आणि पंजाब येथून चार आरोपींना गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. त्यात विकीकुमार साहेबसाह गुप्ता, सागरकुमार जोगीउडर राऊत पाल, अनुजकुमार ओमप्रकाश थापन आणि सोनूकुमार सुभाषचंद्र बिष्णोई याचा समावेश होता. यातील विकीकुमार आणि सागरकुमार यांनी सलमानच्या घराजवळ फायरिंग केले होते तर या दोघांना अनुजकुमार आणि सोनूकुमार यांनी शस्त्रे पुरविल्याचा आरोप होता. पोलीस कोठडीत असताना अनुजकुमारने गळफास लावून आत्महत्या केली होती. या आत्महत्येची सध्या विशेष पथकाकडून चौकशी सुरु आहे. दुसरीकडे या गुन्ह्यांत मोहम्मद रफिकचे नाव समोर आल्यानंतर त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम तो राजस्थानात लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने राजस्थानातून मोहम्मद रफिकला ताब्यात घेतले. या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस येताच त्याला अटक करुन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले.
चौकशीत तो लॉरेन्स बिष्णोई आणि अनमोल बिष्णोई टोळीशी संबंधित असल्याचे उघडकीस आले. तो अनमोलच्या संपर्कात होता. त्याच्याच सांगण्यावरुन त्याने फायरिंग कटातील दोन्ही आरोपींना आर्थिक मदतीसह लॉजिस्टिक सपोर्ट दिला होता. या दोघांनाही तो दोन वेळा भेटला होता. या भेटीदरम्यान त्यांनी सलमानच्या घराची रेकी केली होती. मोहम्मद रफिकची मुंबईत स्वतची डेअरी होती. कोरोनादरम्यान शहरात लॉकडाऊन लागू झाले. त्यात त्याला नुकसान झाले. उत्पनाचा साधन नसल्याने तो तो राजस्थानात निघून गेला होता. याच दरम्यान तो बिष्णोई टोळीच्या संपर्कात आला आणि अनमोलसाठी काम करु लागला. त्याच्या सांगण्यावरुन त्याने कटातील दोन्ही आरोपींना आर्थिक मदत केली होती. याच पैशांतून या दोघांनी बाईक खरेदी करुन काही रक्कम घरभाडे म्हणून दिले होते. अटकेनंतर त्याला पोलीस बंदोबस्तात मोक्का कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मोहम्मद रफिक हा या कटातील पाचवा आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले.